रेल्वे हद्दीतील कल्व्हर्टच्या सफाईसाठी पालिका ‘इन ॲक्शन’; ३१ मेपूर्वी कामे पूर्ण करण्यासाठी कंबर कसली

By ऑनलाइन लोकमत | Published: May 24, 2024 11:20 AM2024-05-24T11:20:54+5:302024-05-24T11:22:56+5:30

पावसाळ्यात तुडुंब भरून वाहणारे नाले, त्यातील कचऱ्यामुळे शहराबरोबरच रेल्वे वाहतुकीवरही विपरित परिणाम होतो.

municipality in action mode for cleaning of culverts in railways area complete the work before 31st may in mumbai | रेल्वे हद्दीतील कल्व्हर्टच्या सफाईसाठी पालिका ‘इन ॲक्शन’; ३१ मेपूर्वी कामे पूर्ण करण्यासाठी कंबर कसली

रेल्वे हद्दीतील कल्व्हर्टच्या सफाईसाठी पालिका ‘इन ॲक्शन’; ३१ मेपूर्वी कामे पूर्ण करण्यासाठी कंबर कसली

मुंबई : पावसाळ्यात तुडुंब भरून वाहणारे नाले, त्यातील कचऱ्यामुळे शहराबरोबरच रेल्वे वाहतुकीवरही विपरित परिणाम होतो. त्यामुळे नालेसफाईच्या कामांसोबत रेल्वे हद्दीतील कल्व्हर्ट (मोरी) ३१ मेपूर्वी स्वच्छ होणे आवश्यक आहे. त्यासाठी प्रत्येक रेल्वे स्थानकामागे एका पालिका अधिकाऱ्याची नियुक्ती केली आहे. रेल्वेकडून हे कल्व्हर्ट स्वच्छ करून घेण्याची जबाबदारी या अधिकाऱ्यांची असणार आहे. मात्र, पावसाळ्याआधी रेल्वे हद्दीतील कल्व्हर्ट स्वच्छ झाल्याचे या अधिकाऱ्यांना प्रमाणित करून देणे गरजेचे असणार आहे, अशी माहिती अतिरिक्त आयुक्त अभिजित बांगर यांनी दिली.

पावसाळापूर्व कामांचा भाग म्हणून पालिकेकडून नालेसफाई केली जाते. मात्र, रेल्वे हद्दीतील कल्व्हर्ट अनेकदा सफाईविना राहिल्याने त्यात पावसाळ्यात पाणी तुंबते. रेल्वे आणि पालिकेत यावरून तू-तू-मैं-मैं ही होते. त्यामुळे पालिका आयुक्तांनी रेल्वे रूळांखालील व इतर ठिकाणीही बंदिस्त प्रवाह मार्गांची (कल्व्हर्ट) स्वच्छता करणे, ही कामे देखील समाविष्ट असल्याचे स्पष्ट केले आहे. त्यामुळे यंदा कल्व्हर्टसाठी पालिकेने कंबर कसली असून, यासाठी सक्षम नियोजन केले आहे.

अनेक भागांत पालिकेने पुढाकार घेऊनही रेल्वे प्रशासनाकडून सफाई करण्यास विरोध होत आहे. त्यामुळे या विषयावर वरिष्ठ पातळीवर चर्चा करण्याची तयारी बांगर यांनी दाखवली.  स्वच्छतेमुळे पावसाळ्यात किमान रेल्वे वाहतूक सुरळीत राहील, यासाठी प्रयत्न आहेत.

१)  रेल्वेप्रमाणेच विविध प्राधिकरणांच्या प्रकल्पांमुळे नालेसफाईच्या कामात अडथळा येतो. त्यामुळे सफाईसाठी विभागस्तरावर पालिकेकडून त्यांच्याशी समन्वय साधला जात असल्याची माहिती बांगर यांनी दिली. 

२)  मेट्रो आणि रेल्वे या प्राधिकरणांशी योग्य समन्वय साधल्यास नालेसफाई चांगली होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

नियोजन काय? 

नालेसफाईचे किती टक्के काम झाले हे नाल्यातून काढलेल्या गाळाशी निगडित असते. फक्त किती टक्के काम पूर्ण झाले हे महत्त्वाचे नसून नाल्याचा किती भाग स्वच्छ झाला हे पालिकेचे मुख्य उद्दिष्ट असल्याचे बांगर यांनी स्पष्ट केले. सद्य:स्थितीत नाल्यातील तरंगता कचरा साफ करणे, १ ते ७ जून दरम्यान नाल्यांच्या मुखाची स्वच्छता करणे तसेच पाणी साचण्याच्या ठिकाणांच्या नाल्यांची स्वच्छता करणे हे या पावसाळ्याच्या दृष्टीने पालिकेचे मुख्य नियोजन असल्याचे बांगर म्हणाले.

Web Title: municipality in action mode for cleaning of culverts in railways area complete the work before 31st may in mumbai

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.