कृत्रिम तलावांसाठी पालिका आग्रही
By Admin | Published: August 23, 2016 01:55 AM2016-08-23T01:55:58+5:302016-08-23T01:55:58+5:30
मुंबई महापालिका अधिकाधिक खबरदारी घेत असून, याच प्रयत्नांचा एक भाग म्हणून प्रशासन गणेशमुर्तींच्या विसर्जनाकरिता कृत्रिम तलावांवर भर देत आहे.
मुंबई : गणेशोत्सवात पर्यावरणाचा ऱ्हास होणार नाही याची मुंबई महापालिका अधिकाधिक खबरदारी घेत असून, याच प्रयत्नांचा एक भाग म्हणून प्रशासन गणेशमुर्तींच्या विसर्जनाकरिता कृत्रिम तलावांवर भर देत आहे. या अंतर्गत गणेशमूर्तींच्या विसर्जनासाठी कृत्रिम तलाव उपलब्ध व्हावेत म्हणून दादर येथील महापौर निवास परिसरात कृत्रिम तलावाच्या बांधकामांचे भूमीपुजन करण्यात आले असून, गणेशविसर्जनासाठी ठिकठिकाणच्या कृत्रिम तलावांसाठी महापालिका आग्रही असणार आहे.
२०१५ साली कृत्रिम विसर्जन स्थळांची संख्या २६ होती. गतवर्षीच्या गणेशोत्सवावेळी कृत्रिम तलावांत १ हजार ४९६ सार्वजनिक गणेशमूर्तींचे विसर्जन करण्यात आले होते. तर घरगुती गणेशमूर्तींचा हाच आकडा २३ हजार ९५७ एवढा होता. एकंदर कृत्रिम तलावांत २५ हजार ४५३ गणेशमूर्तींचे विसर्जन करण्यात आले होते. गणेशभक्तांनी कृत्रिम तलावांना पसंती दिली होती. परिणामी यावर्षीही पर्यावरण संवर्धनाचे आवाहन महापालिकेने गणेशभक्तांना केले असून, गणेशोत्सव सुरु होण्यापूर्वीपासूनच याबाबत जनजागृती सुरु केली आहे.
महापालिकेतर्फे महापौर निवास आणि काही विभागात घरगुती व सार्वजनिक गणेशमूर्तींच्या विसर्जनासाठी कृत्रिम तलावांची व्यवस्था करण्यात येत आहे. गणेशमूर्तीचे विसर्जन कृत्रिम तलावात करावे असे प्रशासनाने म्हटले आहे. (प्रतिनिधी)
थर्माकोलचा वापर टाळा
गणेशोत्सवातील सजावटीसाठी प्लास्टर आॅफ पॅरिस आणि थर्माकोलचा वापर टाळावा. पर्यावरणपूरक कागदी मखरांनी सजावट करावी. मंडळांनी ध्वनी प्रदूषण होणार नाही याची काळजी घ्यावी. जमा होणारे निर्माल्य हे निर्माल्य
कलशातच संकलित करावे. प्लास्टिकच्या पिशव्यांचा वापर करू नये.
खताची निर्मिती
निर्माल्य संकलित करणे आणि त्याची विल्हेवाट लावण्याची वेगळी व्यवस्था महापालिकेतर्फे करण्यात येत आहे. त्यामुळे निर्माल्य समुद्रात अथवा तलावात टाकले जात नाही. पर्यायाने प्रदूषण टळते. गेल्यावर्षी मुंबईकरांनी सहकार्य केल्याने कित्येक टन निर्माल्य संकलित करण्यात आले होते.