Join us

नमुना आणि अहवालास उशीर करणाऱ्या प्रयोगशाळांवर पालिकेची करडी नजर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 15, 2021 4:06 AM

मुंबई : मुंबईत कोरोनाचा संसर्ग दिवसागणिक वाढतोय, त्यानुसार शहर उपनगरात दिवसाला ४०-५० हजार कोरोना चाचण्या करण्यात येत आहेत. मात्र ...

मुंबई : मुंबईत कोरोनाचा संसर्ग दिवसागणिक वाढतोय, त्यानुसार शहर उपनगरात दिवसाला ४०-५० हजार कोरोना चाचण्या करण्यात येत आहेत. मात्र दुसरीकडे खासगी प्रयोगशाळांमध्ये नमुना आणि वैद्यकीय अहवाल मिळण्यास उशीर होत असल्याच्या तक्रारी सातत्याने समोर येत आहेत. त्यामुळे आता अशा स्वरूपाची वागणूक करणाऱ्या प्रयोगशाळांवर पालिकेची करडी नजर राहणार असून योग्य निकष न पाळल्यास कठोर कारवाईला सामोरे जावे लागणार आहे.

मागील आठवड्याभरापासून खासगी प्रयोगशाळांमध्ये कोरोना चाचणी करण्याकरिता वेळ घेण्यासाठी तासन् तास लागत आहे. शिवाय, नमुना घेतल्यानंतरही दोन दिवसांनंतरही वैद्यकीय अहवाल देत नसल्यामुळे रुग्ण आणि रुग्णांचे कुटुंबीय/नातेवाईक हैराण होत असल्याच्या तक्रारी सातत्याने समोर येत आहेत. याविषयी, मेट्रोपाॅलीस प्रयोगशाळा व्यवस्थापनाने सांगितले, मागील काही दिवसांत चाचण्या करण्यासाठी गर्दी करणाऱ्यांची संख्या वाढली आहे. परिणामी, अहवाल येण्यासही काहीसा विलंब लागत आहे. यात अहवाल निगेटिव्ह असल्यास २४ तासांत अहवाल देत आहोत, मात्र अन्य अहवालांना काहीसा वेळ लागत आहे.

पालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी सांगितले, खासगी प्रयोगशाळा क्षमतेहून अधिक नमुने गोळा करत असल्याने या सिस्टीमवर ताण येत आहे. परिणामी, वैद्यकीय अहवालांसाठी ४८ तासांहून अधिक वेळ लागत आहे. याउलट, पालिकेच्या रुग्णालयात वा कोविड केंद्रात वॅक इन चाचण्यांची सोय उपलब्ध आहे, शिवाय अहवालही वेळेत प्राप्त होत आहे. मात्र उच्चमध्यमवर्गीयांचा खासगी प्रयोगशाळांकडे अधिक कल असल्याचे दिसून येत आहे. सातत्याने अहवालास विलंब लावणाऱ्या आणि क्षमतेहून अधिक ताण घेणाऱ्या खासगी प्रयोगशाळांची माहिती घेऊन त्यांना नोटीस पाठविण्यात येणार आहे.