क्रीडांगणे, मैदानाच्या धोरणावर पालिकेत गदारोळ
By सीमा महांगडे | Published: December 1, 2023 04:55 PM2023-12-01T16:55:54+5:302023-12-01T16:57:10+5:30
पालकमंत्री मंगलप्रभात लोढा यांच्या अध्यक्षतेखाली बैठक सुरू असताना काँग्रेस पक्षातील नगरसेवकांनी यावर आक्षेप घेतला.
मुंबई : खुली मैदाने आणि मोकळ्या जागांचे धोरण यावर पालिकेत पश्चिम उपनगरचे पालकमंत्री मंगलप्रभात लोढा यांच्या अध्यक्षतेखाली बैठक सुरू असताना काँग्रेस पक्षातील नगरसेवकांनी यावर आक्षेप घेतला. दरम्यान पालिकेत यावर मोठा गदारोळ होऊन निषेध करीत ते बैठक अर्धवट सोडून निघून गेले. काँग्रेस नगरसेविका शीतल म्हात्रे यांनी या बैठकीत महनगर पालिका आयुक्त प्रशासक असल्याने ते या बैठकीत उपस्थित हवे होते अशी मागणी केली. शिवाय अशरफ आझमी यांनी सद्या नगरसेवक अस्तित्वात नसल्याने यावर चर्चा होणे योग्य नसल्याचे म्हंटले.
मोकळ्या मैदानाच्या महत्त्वाच्या धोरणावर केवळ 5 ते 10 मिनिटे मत व्यक्त करणे म्हणजे मुद्द्यांना बगल देणे असल्याचे त्यांनी म्हंटले. मात्र पालकमंत्र्यांनी प्रत्येकाला इतकाच वेळ मिळेल असे सांगत सद्या आपण फक्त सूचना मगवित असल्याचे स्पष्ट केले. मात्र काँग्रेस नगरसेवकांनी याचा निषेध केल्यानंतर बैठकीला उपस्थित भाजपच्या माजी नगरसेवक यांनी यांमध्ये वाद निर्माण झाला आणि काँग्रेस नगरसेवक बैठक अर्धवट सोडून निघून गेले.
या शिवाय मुंबईतील मोकळया जागेची निगा पालिकेनेच राखावी आणि दत्तक देऊ नये, अशी मागणी आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली यांनी केली. मोकळया जमीनेचे परिरक्षण करणे आणि निगा राखणे आवश्यक आहे. तसेच सद्या जी मैदाने, उद्यान आणि खुली जमीन ११ महिन्यासाठी दिली आहेत त्यांची सविस्तर माहिती संकेतस्थळावर अपलोड करावी असे ही त्यांनी म्हंटल.