Join us  

आपत्तीसाठी महापालिका सज्ज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 20, 2017 2:55 AM

मुंबईत २६ जुलैला आलेल्या महापुराने महापालिकेसह नियंत्रण कक्षाची पोलखोल केली होती. मात्र त्या वेळी पुरेसा सज्ज नसलेला आपत्कालीन नियंत्रण कक्ष

मुंबईत २६ जुलैला आलेल्या महापुराने महापालिकेसह नियंत्रण कक्षाची पोलखोल केली होती. मात्र त्या वेळी पुरेसा सज्ज नसलेला आपत्कालीन नियंत्रण कक्ष आता प्रत्येक आपत्तीवर नियंत्रण ठेवण्यास २४ तास तयार असल्याचा पालिकेचा दावा आहे. पुरेसा कामगार व अधिकारी वर्ग नियंत्रण कक्षाकडे उपलब्ध असून भारतीय तटरक्षक दल, नौदल, थलसेना, आपत्ती प्रतिसाद पथक आणि मुंबई पोलिसांचे सहकार्यही पालिकेसोबत आहे. त्यामुळे यापुढे कोणतीही आपत्ती आली, तरी महापालिकेचा नियंत्रण कक्ष त्याला सक्षमपणे सामोरा जाईल, असा विश्वास महापालिका नियंत्रण कक्षाचे प्रमुख महेश नार्वेकर यांनी व्यक्त केला आहे. ‘लोकमत’ला दिलेल्या खास मुलाखतीत नार्वेकर यांनी महापालिकेच्या नियंत्रण कक्षाच्या तयारीवर टाकलेला हा प्रकाश...आपत्कालीन परिस्थितीस तोंड देण्यास महापालिकेचा आपत्कालीन नियंत्रण कक्ष सज्ज आहे?- मुंबईवर ५ हजार ५०० कॅमेऱ्यांचा वॉच, ५८ ठिकाणी ६० स्वयंचलित पर्जन्यमान केंद्रे आणि भौगोलिक माहिती प्रणालीद्वारे (जीटीएस) नियंत्रण कक्ष वर्षाचे ३६५ दिवस व २४ तास कार्यरत आहे. आपत्तीवर नियंत्रण मिळवण्यासाठी महापालिकेची २४ प्रशासकीय कार्यालये व २७ बाह्य यंत्रणांना जोडणाऱ्या ५१ हॉटलाइन्स काम करत आहेत. मुंबईकरांसाठी १९१६ ही थेट दूरध्वनी सेवा उपलब्ध असून १०२ प्रकारच्या आपत्तींवर केंद्रांद्वारे नियंत्रण मिळवता येऊ शकते. २६ जुलैला आलेल्या आपत्तीवेळी नियंत्रण कक्षाकडे जागेपासून बऱ्याच गोष्टींचा अभाव होता. मात्र आता ७ हजार ५०० चौरस फुटांवर पसरलेल्या नियंत्रण कक्षासह सुनिश्चित कार्यपद्धती आहे. नौसेनेची पथके, भारतीय सैन्याच्या ६ तुकड्या, भारतीय तटरक्षक दलाची ४ पथके, राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद पथकाच्या ३ तुकड्या आपत्ती नियंत्रण कक्षाकडून शहरातील विविध ठिकाणी तैनात केलेल्या आहेत. काही अशासकीय यंत्रणाही सोबत आहेतच. जहाज, हेलिकॉप्टर्स, पाणबुड्या आणि पूर बचाव पथके तत्पर आहेत.पावसाळ्यात कक्षाने विशेष तयारी केली आहे का?- पावसाळा सुरू होण्यापूर्वीच नियंत्रण कक्षाच्या व इतर संबंधित अधिकाऱ्यांसोबत, नौदल, सेनादल, आपत्ती प्रतिसाद पथकांसोबत समन्वय सभा झाल्या. पाणी साचण्याच्या ठिकाणी पूर मदत पथक सज्ज असते. अतिपावसामुळे एखादी हॉटलाइन बंद होऊ शकते, म्हणून वेगवेगळ्या कंपन्यांच्या चार हॉटलाइन सज्ज आहेत. त्यातील हॅम रेडिओ हॉटलाइन ही कोणत्याही परिस्थितीत कधीच बंद होत नाही.कक्षाद्वारे कोणत्या अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केला जात आहे?- भौगोलिक माहिती प्रणाली हे आमच्याकडचे सर्वांत मोठे तंत्रज्ञान आहे. त्याशिवाय आपत्तीबद्दल त्वरित माहिती मिळविण्यासाठी शहरातील नागरिकांशी जोडण्यासाठी महापालिकेचे मोबाइल अ‍ॅप आणि संकेतस्थळ आहे. या सर्वांमध्ये रोज नव्या सुधारणाही केल्या जात आहेत.आपत्ती निवारणासंदर्भात युवांना प्रशिक्षण घेण्यासाठी काय करावे लागेल?- या वर्षीपासून मुंबई विद्यापीठाअंतर्गत इन्स्टिट्यूट आॅफ डिझास्टर मॅनेटमेंट सुरू झाली आहे. या संस्थेत विद्यार्थ्यांना आपत्ती निवारणाचे धडे गिरवता येणार असून आॅगस्टच्या पहिल्या आठवड्यात यासंदर्भातील कोर्स सुरू होईल. मुळात अशी प्रशिक्षण संस्था असलेली मुंबई महानगरपालिका ही देशातील पहिली महापालिका ठरली आहे. टाटा इन्स्टिट्यूट आॅफ सोशल सायन्समध्येही आपत्ती व्यवस्थापनामध्ये एमएससी करता येते. इंदिरा गांधी नॅशनल ओपन युनिव्हर्सिटीमध्येही आपत्ती निवारणासंदर्भात एक वर्षाचा कोर्स शिकवला जातो.या क्षेत्राकडे करिअर म्हणून पाहता येईल का?- नक्कीच! तरुणाईने या क्षेत्राकडे करिअर म्हणून पाहावे. भविष्यात या क्षेत्रात करियरसाठी खूप वाव आहे. गेल्या कित्येक वर्षांमध्ये मुंबईसह जगभर विविध प्रकारच्या आपत्तींना सामोरे जावे लागले आहे. त्यामुळे सर्व प्रकारच्या संकटांना तोंड देऊ शकतील अशा प्रशिक्षित तरुणांची जगाला गरज आहे. मात्र त्यासाठी शिक्षण गरजेचे आहे. तसेच केवळ करिअर म्हणूनच नाही, तर स्वत:च्या आणि इतरांच्या सुरक्षिततेसाठी सर्वांनी नेहमीच सज्ज असायला हवे.सागरी सुरक्षेबाबत काय तयारी केली आहे?- भरतीमुळे ४.५ मीटरहून जास्त उंचीच्या लाटा उसळतात. शनिवार, रविवार व सार्वजनिक सुट्टीच्या दिवशी पर्यटक समुद्रकिनाऱ्यांकडे वळतात. ६ समुद्रकिनाऱ्यांवर जीवरक्षकांसह अग्निशमन दलाचे अधिकारी, जवान, पोलीस, पेट्रोलिंग वाहने, राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद पथकांचे जवान तैनात असतात. मुलाखत : अक्षय चोरगे