कोरोनाचा सामना करण्यासाठी पालिका सज्ज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 5, 2020 05:22 AM2020-03-05T05:22:05+5:302020-03-05T05:22:13+5:30
या व्हायरसचा सामना करण्यासाठी पालिकेने राजावाडी, कुर्ला भाभा, वांद्रे भाभा आणि जोगेश्वरी येथील ट्रॉमा केअर या रुग्णालयांमध्ये विशेष कक्ष सज्ज ठेवले आहेत.
मुंबई : कोरोना विषाणू प्रकरणी तीन संशयित रुग्णांवर कस्तुरबा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या व्हायरसचा सामना करण्यासाठी पालिकेने राजावाडी, कुर्ला भाभा, वांद्रे भाभा आणि जोगेश्वरी येथील ट्रॉमा केअर या रुग्णालयांमध्ये विशेष कक्ष सज्ज ठेवले आहेत. संशयित रुग्णांच्या रक्ताच्या नमुन्यांची तपासणी पुणेऐवजी कस्तुरबा रुग्णालयातील अद्ययावत प्रयोगशाळेत होऊन अवघ्या पाच तासांमध्ये अहवाल मिळू लागला आहे.
मुुंबईत आतापर्यंत कोरोनाची लागण झालेला एकही रुग्ण आढळून आलेला नाही. मात्र देशाच्या आर्थिक राजधानीतही कोरोनाचा शिरकाव झाल्यामुळे मुंबई महापालिकेतर्फे आपत्कालीन उपाययोजना म्हणून साधनसामग्री खरेदीसाठी दोन कोटींच्या निधीची तरतूद करण्यात आली आहे. याबाबत महापौर किशोरी पेडणेकर व अतिरिक्त आयुक्त सुरेश काकानी यांनी प्रसारमाध्यमांना माहिती दिली. परदेशातून आलेल्या ६५ हजार प्रवाशांची ‘थर्मल स्कॅनर’ने तपासणी केली आहे. ३०० संशयित रुग्णांच्या घरी जाऊन तपासले आहे. ६२ संशयितांवर उपचार केले असून सध्या तीन संशयित कस्तुरबा रुग्णालयात उपचार घेत आहेत. संशयित रुग्णांचा अहवाल निगेटिव्ह आला तरी त्या रुग्णाला १४ दिवस निरीक्षणाखाली ठेवण्यात येणार असल्याचे अतिरिक्त आयुक्त काकानी यांनी सांगितले.
कोरोनाच्या संशयित रुग्णाच्या घशाच्या व नाकाच्या स्रावाचा नमुना तपासणीसाठी पूर्वी पुणे येथील लॅबमध्ये पाठविण्यात येत होता. मात्र आता कस्तुरबात स्थापन केलेल्या ‘पीसीआर लॅब’मध्ये तीन तासांत तो तपासण्यात येऊन पाच तासांत अहवाल मिळतो. कोरोनाची लागण होऊ नये यासाठी नागरिकांनी गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळावे. हस्तांदोलन करू नये. खोकला, सर्दी असल्यास रुमाल तोंडाला लावावा. होळीला गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळावे. शिळे अन्नपदार्थ खाणे टाळावे. मांस खाऊ नये, असे आवाहन पालिकेने केले.
अशी आहेत लक्षणे
३८ डिग्रीसेंटी ग्रेडपेक्षाही जास्त ताप येणे, खोकला व सर्दी होणे, घसा दुखणे, डोकेदुखी, अंगदुखी आणि श्वास घेण्यास त्रास होणे.
तीन हजार मास्क,
औषधांचा पुरेसा साठा
कोरोनाच्या संशयित रुग्णाला उपचार देण्यासाठी पालिकेने कस्तुरबा रुग्णालयात विशेष कक्षाची व्यवस्था केली आहे. कक्ष क्रमांक ३० मध्ये २८ खाटांची व्यवस्था आहे. तर आणखी दोनशे खाटा वाढविण्यात येतील.
चार विलगीकरण खोल्या असून प्रत्येकी चार व्हेंटिलेटर व मल्टी पॅरा मॉनिटरची व्यवस्था केली आहे.
नर्स व डॉक्टरांना कोरोनाबाबत प्रशिक्षण देण्यात आले आहे. तीन हजार मास्क आणि औषधांचा पुरेसा साठा उपलब्ध करून देण्यात आला आहे.