वादळ, पूर, आग, दरडीच्या आपत्तींसाठी पालिका सज्ज
By सीमा महांगडे | Updated: December 19, 2024 14:23 IST2024-12-19T14:22:19+5:302024-12-19T14:23:15+5:30
विविध विभागांना डिझास्टर मॅनेजमेंट प्लान देण्याची सूचना

वादळ, पूर, आग, दरडीच्या आपत्तींसाठी पालिका सज्ज
सीमा महांगडे, लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई : मुंबईकरांना मागील काही वर्षांत चक्रीवादळ, अतिवृष्टीमुळे पूर, दरड दुर्घटना, आग अशा अनेक आपत्तींना वेळोवेळी सामना करावा लागला आहे. याचा परिणाम मुंबईच्या अर्थव्यवस्थेबरोबरच सामाजिक व्यवस्थेवरही पडत आहे. या आपत्तींचे नियंत्रण व व्यवस्थापन करण्यासाठी आता पालिकेतील विविध विभागाकडून डिझास्टर मॅनेजमेंट प्लान मागवण्यात आला आहे, अशी माहिती अतिरिक्त आयुक्त अमित सैनी यांनी दिली आहे.
या आराखड्यानुसार या विभागांसाठी आपत्ती व्यवस्थापन निधीची तरतूद करून देण्यात येणार आहे. मागील काही वर्षांत विविध नैसर्गिक आपत्ती, अपुऱ्या पायाभूत सुविधा, वाढते शहरीकरण यामुळे वाढती लोकसंख्या आणि त्यांच्या जीवनमानावर विपरीत परिणाम होतो आहे. या आपत्ती व्यवस्थापनातील जोखीम कमी करण्यासाठी पालिका प्रशासनाच्या विविध विभागांकडून मार्गदर्शक सूचनांनुसार आवश्यक उपाययोजना आणि तरतुदी करण्याच्या सूचना मुंबई शहर आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाकडून देण्यात आल्या आहेत. यात विकास नियोजन, पर्यावरण विभाग, पूल आणि रस्ते, पर्जन्य जलवाहिन्या, इमारती व पायाभूत सुविधा, सार्वजनिक आरोग्य सुविधा अशा विविध विभागाकडून डिझास्टर मॅनेजमेंट प्लान तयार करण्याची सूचना प्रशासनाने केली आहे.
मुळात पालिकेचा आपत्ती व्यवस्थापन विभाग प्रयत्नशील असूनही अशा जोखमीच्या वेळेस त्यांचे प्रयत्न तोकडे पडल्याचे दिसून येते. त्यामुळे मुंबईच्या विविध पायाभूत सुविधा, सेवा, नियोजन प्राधिकरणे आदी प्रत्येक विभागाकडून स्वतंत्र कार्यपद्धती अवलंबणे महत्त्वाचे असल्याचे स्पष्ट झाले आहे. केंद्र सरकारच्या नॅशनल डिझास्टर रिस्पॉन्स फंड, नॅशनल डिझास्टर मिजिटेशन फंड तसेच यासाठी राज्य स्तरावरील आपत्ती व्यवस्थापन निधी त्यासाठी उपलब्ध करून देण्यात आला आहे. त्या त्या विभागाला आवश्यक निधीची तरतूद होण्याच्या दृष्टीने त्यांच्या डिझास्टर मॅनेजमेंट प्लानचा संदर्भ घेण्यात येणार असल्याचेही स्पष्ट करण्यात येत आहे.
पालिकेच्या सगळ्या विभागांना आपल्या कार्यक्षेत्रातील आपत्ती व त्यासाठी काय आवश्यक उपाययोजना असावी, याची माहिती असायला हवी. त्यामुळे संबंधित विभागांना प्रकल्प हाती घेताना आपत्ती उद्भवल्यास काय उपाययोजना कराव्यात, हे समजेल आणि त्यादृष्टीने प्रकल्पाची अंमलबजावणी करता येईल. अशा पद्धतीने डिझास्टर मॅनेजमेंट प्लान सादर केल्यास निधीची तरतूद आगामी अर्थसंकल्पात करता येणार आहे. तसेच ही सर्व माहिती आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाला देणे बंधनकारक आहे, असेही त्यांनी नमूद केले आहे.