नवरात्रोत्सवासाठी पालिका सज्ज; गणेशोत्सवाच्या तुलनेत सरकारी यंत्रणांवर ताण कमी, पण खबरदारी कायम
By ऑनलाइन लोकमत | Published: October 11, 2023 01:05 PM2023-10-11T13:05:42+5:302023-10-11T13:07:47+5:30
प्रत्येक उत्सव हा पर्यावरणपूरक असावा यासाठी पालिका प्रशासन प्रयत्न करीत आहे.
मुंबई : गणेशोत्सवाप्रमाणेच आता सुरू होणाऱ्या नवरात्रोत्सवासाठी पालिका प्रशासन सज्ज होत आहे. त्यासाठीचा आढावा घेण्यात येणार आहे. प्रत्येक उत्सव हा पर्यावरणपूरक असावा यासाठी पालिका प्रशासन प्रयत्न करीत आहे.
नवरात्रोत्सवाच्या आयोजन, नियोजनाबाबतच्या सूचना दिल्या जाणार असल्याची माहिती मुंबई पालिकेचे परिमंडळ २ चे उपायुक्त रमाकांत बिरादार यांनी दिली. मागीलवर्षी मुंबई पालिकेने शहर आणि उपनगरांमधील १,३०४ नवरात्रोत्सव मंडळांना मंडप उभारण्याची परवानगी दिली होती.
गणेशोत्सवाप्रमाणेच नवरात्रोत्सवात रस्त्यांवर मंडप उभारण्यासाठी सार्वजनिक नवरात्रोत्सव मंडळांना मुंबई महानगरपालिकेची परवानगी घ्यावी लागते. मुंबई महानगरपालिकेने यंदा १,३०४ नवरात्रोत्सव मंडळांना परवानगी दिली आहे. एकूण १७०० नवरात्रोत्सव मंडळांनी मंडप परवानगीसाठी महानगरपालिकेकडे अर्ज केले होते. काही मंडळांनी दुबार अर्ज केले होते. अशा मंडळांची संख्या २५० इतकी होती तर महापालिकेकडून एकूण १६२ नवरात्रोत्सव मंडळांचे अर्ज निरनिराळ्या कारणामुळे फेटाळण्यात आले होते.
शाडू मातीला मागणी नाही
- शाडू मातीच्या देवीच्या मूर्ती साकारण्यासाठी शाडूची माती उपलब्ध करण्याचा निर्णय पालिका प्रशासनाने घेतला. गुजरातमधून शाडूची माती उपलब्ध करण्यासाठी निविदा मागवण्यात आल्या.
- देवीच्या मूर्ती या आधीच साकारण्यात आल्याने आता शाडूच्या मातीचे काय करणार, असा सवाल मूर्तिकारांनी उपस्थित केला आहे. त्यामुळे शाडूच्या मातीसाठी मागणीच आली नसल्याचे बिरादार यांनी स्पष्ट केले.
- नवरात्रोत्सवात सामाजिक उपक्रम, आरोग्यदायी उपक्रम, प्लास्टिक पिशव्यांचा वापर टाळा, असे आवाहन पालिका प्रशासनाने नवरात्रोत्सव मंडळांना केले आहे
मुंबई शहर आणि पश्चिम उपनगराचे पालकमंत्री यांच्या अध्यक्षतेखाली पालिका प्रशासनाची बैठक होणार आहे. यात नवरात्रोत्सवासाठी आवश्यक परवानग्या, सोयी सुविधा, विसर्जनासाठी कृत्रिम तलाव, उत्सव काळात स्वच्छतेसाठी आवश्यक तयारी, अग्निशमन सुरक्षा या सर्व सुविधा व त्यांच्या तयारीचा आढावा घेतला जाणार आहे.
- रमाकांत बिरादार, उपायुक्त परिमंडळ २, मुंबई पालिका
कृत्रिम तलावांची व्यवस्था
गणेशोत्सवाच्या तुलनेत नवरात्रोत्सवात यंत्रणांवर ताण कमी असतो. विसर्जनाच्या सुविधेअंतर्गत वीज, विसर्जनासाठी बोट आदी सुविधा पालिकेकडून उपलब्ध करण्यात आल्या. यंदाही सुविधांच्या नियोजनासाठी प्रशासन तयारी करणार आहे. मंडळाचा चांगला प्रतिसाद मिळतो, हे पाहून कृत्रिम तलावांची व्यवस्था करण्यात येणार आहे.
मावा-मिठाई विकणाऱ्या आस्थापनांची तपासणी?
सण-उत्सवांच्या कालावधीत मिठाई सेवनाने विषबाधेचे प्रकार घडू नये म्हणून खाद्य पदार्थ विकणाऱ्या आस्थापनांनी विशेष खबरदारी घ्यावी, असे आवाहन मुंबई पालिकेच्या सार्वजनिक आरोग्य खात्याने केले.
तसेच आगामी काळात वैद्यकीय आरोग्य अधिकारी, स्वच्छता निरीक्षक त्यांच्या आपापल्या कार्यकक्षेतील मावा, मिठाईची दुकाने, मावा साठवणूक शीतगृह यांची कसून तपासणी करावी, असे निर्देश पालिकेकडून देण्यात आले आहेत. ही विशेष टॅप्सनी मोहीम डिसेंबरपर्यंत सुरू राहणार आहे.
महानगरपालिकेचे सर्व वैद्यकीय आरोग्य अधिकारी, स्वच्छता निरीक्षकांना १ सप्टेंबर ते ३१ डिसेंबर २०२३ या काळात नवरात्र, दसरा, दिवाळी व नाताळ इत्यादी सणांच्या पार्श्वभूमीवर विशेष मोहीम राबविण्याचे निर्देश देण्यात आले.
मागील वर्षीची आकडेवारी आहे -
१,७०० मंडळांनी मंडप परवानगीसाठी पालिकेकडे अर्ज केले होते.
१,३०४ नवरात्रोत्सव मंडळांना मंडप उभारण्याची परवानगी दिली.