पाणी, स्वच्छतागृहे, आरोग्यसेवेसह पालिका धावली मदतीला
By ऑनलाइन लोकमत | Published: December 7, 2023 09:35 AM2023-12-07T09:35:32+5:302023-12-07T09:37:15+5:30
स्वच्छतागृह, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, आरोग्य सेवा, रुग्णवाहिका, हिरकणी कक्ष यामुळे अनुयायांना दिलासा मिळाला.
मुंबई : भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, महामानव, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६७ व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त त्यांना अभिवादन करण्यासाठी मुंबईत देशभरातून अनुयायी आले आहेत. या अनुयायांच्या मदतीसाठी पालिकेने पुढाकार घेत विविध सोयीसुविधा उपलब्ध करून दिल्या. स्वच्छतागृह, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, आरोग्य सेवा, रुग्णवाहिका, हिरकणी कक्ष यामुळे अनुयायांना दिलासा मिळाला.
दरवर्षी लाखोंच्या संख्येने अनुयायी दादर येथील चैत्यभूमी, शिवाजी पार्क येथे येतात. त्यांना कोणतीही कमतरता भासू नये यासाठी मुंबई पालिकेकडून विशेष सोयी सुविधा उपलब्ध करून दिल्या जातात. यंदाही पालिकेकडून अनुयायांसाठी विशेष काळजी घेण्यात आली होती. यामध्ये प्रामुख्याने तात्पुरता निवारा, शामियाना, व्ही.आय.पी. कक्ष, नियंत्रण कक्ष, रुग्णवाहिका, आरोग्य सेवा, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, स्वच्छतागृह, स्नानगृहे, बैठक व्यवस्थेसाठी बाकडे, विद्युत व्यवस्थेसह मोबाइल चार्जिंग सुविधा इत्यादी सोयी-सुविधा उपलब्ध करून दिल्या होत्या, तर स्तनदा माता व त्यांच्या बालकांसाठी यंदा चैत्यभूमी व शिवाजी पार्क येथे हिरकणी कक्ष उपलब्ध करून देण्यात आला होता.
चैत्यभूमी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकाच्या ठिकाणी अभिवादन करण्यासाठी देशभरातून अनुयायी आले होते. या अनुयायांसाठी तात्पुरता निवारा, शामियाना उभारण्यात आला असून, आपत्कालीन परिस्थितीत तात्पुरत्या निवाऱ्याची सोय म्हणून येथील पालिकेच्या सहा शाळा निश्चित केल्या आहेत. अनुयायांनी पालिकेच्या या सोयीसुविधांचा लाभ घेतल्यामुळे त्यांना दिलासा मिळाला आहे - प्रशांत सपकाळे, सहायक आयुक्त, जी उत्तर प्रभाग
मोठ्या पडद्यांवर थेट प्रक्षेपण :
चैत्यभूमी स्मारकातील आदरांजली कार्यक्रमाचे मोठ्या पडद्यावर थेट प्रक्षेपण दाखवण्यात येत होते. या मोठ्या स्क्रीन्स अनेक भागात लावण्यात आल्या होत्या. तर फेसबुक, ट्वीटर, यूट्यूब या सोशल मीडियाद्वारे पालिकेकडून थेट प्रक्षेपणाची व्यवस्था करण्यात आली होती.
जागतिक पाऊलखुणा पुस्तिका :
पालिकेच्या जनसंपर्क विभागातर्फे दरवर्षी महापरिनिर्वाण दिनानिमित्त सचित्र माहिती पुस्तिका प्रकाशित करण्यात येते. यंदाही डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जागतिक पाऊलखुणा ही पुस्तिका मान्यवरांच्या हस्ते प्रकाशित करण्यात आली व त्याच्या १ लाख प्रतीचे वितरण विनामूल्य करण्यात आले. या पुस्तिकेत बाबासाहेबांचे वास्तव्य, कार्य आदींचा संदर्भ असलेल्या देशांमध्ये उभारण्यात आलेल्या पुतळ्यांचे छायाचित्र आणि माहिती देण्यात आली आहे.