मुंबई :
पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करण्याकडे गणेशभक्तांचा वाढता कल लक्षात घेऊन मुंबई पालिकेमार्फत यंदा मूर्तीदानाचा अभिनय उपक्रम राबविण्यात येत आहे. मुंबईत १२ विविध ठिकाणी पालिकेमार्फत गणेशमूर्ती संकलन केंद्रे उभारण्यात आली आहेत. पर्यावरण संवर्धनासाठी गणेशमूर्तींचे विसर्जन नदीपात्रात किंवा तलाव, समुद्रात न करता गरजूंना किंवा आदिवासी गावातील पाड्या, वस्तीवरील इच्छुकांना पूजनासाठी दान करण्याचा निर्णय पालिकेने घेतला आहे. अनंत चतुदर्शी दिवशी हा उपक्रम राबविण्यात येणार असून ज्यांना गणेशाची मूर्ती विसर्जनाऐवजी दान करण्याची इच्छा आहे त्यांनी या संकलन केंद्राशी संपर्क करण्याचे आवाहन गणेशोत्सव समितीचे समन्वयक आणि परिमंडळ- २ चे उपायुक्त रमाकांत बिरादार यांनी दिली.
यंदाच्या गणेशोत्सवाचे स्वरूप आणि वैशिष्ट्य सांगताना यंदा अधिकाधिक सार्वजनिक मंडळांनी पर्यावरणपूरक आणि समाजोपयोगी संदेश देणाऱ्या देखाव्यांचा प्रसार केल्याची माहिती बिरादार यांनी दिली. अनेक मूर्तिकरांनी यंदा स्वतःहून पालिकेला संपर्क करीत शाडूच्या मातीची मागणी केली असल्याने यंदा पर्यावरणपूरक मूर्तींची संख्याही वाढली असल्याचे त्यांनी नमूद केले. पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करण्याच्या दृष्टीने हे सकारात्मक पाऊल असल्याचेही त्यांनी यावेळी म्हटले. यंदा पालिकेचे १० हजार कर्मचारी, जीवरक्षक, ७१ नियंत्रण कक्ष, तसेच प्रथमोपचार केंद्र, रुग्णवाहिका, प्रसाधन केंद्र आणि विविध सुविधांची सोय केल्याची माहिती बिरादार यांनी दिली.
यंदाचा गणेशोत्सव संपूर्णपणे साजरा करण्याचा पालिकेचा उद्देश पूर्ण होऊ शकला नसला तरी पुढच्या वर्षी पालिका यासाठी आणखी जोमाने प्रयत्न करणार असल्याची माहिती त्यांनी दिली. याच पार्श्वभूमीवर पुढच्या वर्षाच्या तयारीसाठी गणेशोत्सवाच्या चार महिने आधीच पालिका पर्यावरणपूरक गणेशोत्सवासाठी मोर्चेबांधणी सुरू करणार आहे. पुढच्या वर्षी चार महिने आधीच गणेशोत्सव मंडळे, मूर्तिकार यांच्यासोबत बैठका घेऊन तयारी केली जाणार असल्याचे बिरादर यांनी सांगितले.