मुंबई : मुंबईतील मनपा शाळांत २०१५-१६ या शैक्षणिक वर्षात ६४ हजार ६८१ विद्यार्थी कुपोषित होते. मात्र, अवघ्या एका वर्षात म्हणजे २०१६-१७ या वर्षात मनपा शाळांत एकही विद्यार्थी कुपोषित नसल्याची माहिती प्रजा फाउंडेशनच्या अहवालात समोर आली आहे. मनपाने कुपोषणमुक्तीसाठी नेमके केले तरी काय, असा सवाल ‘प्रजा’ने उपस्थित केला आहे.
मुंबई प्रेस क्लबमध्ये सोमवारी झालेल्या पत्रकार परिषदेत मुंबई मनपा आणि अंगणवाड्यांमधील विद्यार्थ्यांच्या आरोग्याबाबतचा अहवाल प्रजा फाउंडेशनने प्रसिद्ध केला. यामध्ये कुपोषित विद्यार्थ्यांसह प्रमाणाहून कमी वजन असलेल्या विद्यार्थ्यांची आकडेवारी जाहीर करण्यात आली. ही माहिती प्रजा फाउंडेशनने मनपाकडून माहितीच्या अधिकारात मिळविली होती.
या अहवालात मनपा शाळांतून अवघ्या वर्षभरात ६४ हजार ६८१ विद्यार्थी कुपोषणमुक्त झाल्याचा दावा करण्यात आला आहे. याशिवाय मनपाच्या प्राथमिक आणि माध्यमिक शाळांत प्रमाणाहून कमी वजन असलेल्या विद्यार्थ्यांत तब्बल ८४ टक्क्यांनी घट झाल्याची माहितीही मनपाने दिल्याचे प्रजाचे म्हणणे आहे. २०१६-१७ साली प्रमाणाहून वजन कमी असलेल्या विद्यार्थ्यांची संख्या ७३ हजार ११२ इतकी होती. मात्र, अवघ्या वर्षभरात (२०१७-१८ मध्ये) हा आकडा ११ हजार ७२० पर्यंत घसरला आहे. त्यामुळे मनपा शाळांतून एका वर्षात कुपोषणमुक्ती करणाऱ्या आणि विद्यार्थ्यांचे वजन प्रमाणात आणणाºया प्रशासनाने नेमकी कोणती उपाययोजना केली, असा सवाल प्रजाने उपस्थित केला आहे.अंगणवाडी सेविका आणि मदतनिसांची कमतरतामनपा शाळांसोबतच आयसीडीएस योजनेअंतर्गत चालवण्यात येणाºया अंगणवाड्यांमध्ये यंदा ८९ अंगणवाडी सेविका आणि ७५४ मदतनिसांची कमतरता असल्याचे प्रजाने निदर्शनास आणून दिले. अंगणवाडीत येणाºया ५ वर्षांखालील बालकांपैकी १८ टक्के लहान मुलांचे वजन प्रमाणाहून कमी आहे. महत्त्वाची बाब म्हणजे राज्यातील कुपोषणाच्या प्रश्नावर हिवाळी अधिवेशन, अर्थसंकल्पीय अधिवेशन आणि पावसाळी अधिवेशनात एकूण २६ आमदारांनी १४७ प्रश्न उपस्थित केले होते. मात्र, यामधील मुंबईतील केवळ५ आमदारांनी प्रत्येकी फक्त एकच प्रश्न उपस्थित केला आहे.