Join us

पालिकेत शिवसेनेची मदार दिल्लीवीरांवर

By admin | Published: November 20, 2014 1:08 AM

पालिकेचा गड सांभाळणा-या शिलेदारांचे प्रमोशन झाल्यामुळे शिवसेनेची चांगलीच गोची झाली आहे़

मुंबई : पालिकेचा गड सांभाळणा-या शिलेदारांचे प्रमोशन झाल्यामुळे शिवसेनेची चांगलीच गोची झाली आहे़ खंबीर नेतृत्व नसल्यामुळे विरोधकांच्या हल्ल्यास सामोरे जाताना सेना नगरसेवकांची भंबेरी उडत आहे़ त्यातच मित्रपक्ष वैरी झाल्यामुळे पक्षाला तीव्रतेने अनुभवी नेत्यांची उणीव भासू लागली आहे़ यामुळे दिल्लीवीरांनाच आता पालिकेत हजेरी लावण्यास पाचारण करण्यात येत असल्याचे सूत्रांकडून समजते़वादविवाद व वक्तृत्वात विरोधकांना जेरीस आणणारे शिवसेनेतील निम्मे नेते आरक्षणात बाद झाले़ २०१२ च्या निवडणुकीनंतर काही मोजकेच अनुभवी व जाणते नगरसेवक पालिकेत उरले़ लोकसभा व विधानसभा निवडणुकीच्या काळातच हे संकट आल्यामुळे सेनेने धोका न पत्करता तीन शिलेदारांवरच पालिकेचा कारभार सोपविला़ त्यानुसार संपर्काची जबाबदारी सुनील प्रभूंवर, आर्थिक बाजू राहुल शेवाळे व शिस्त यशोधर फणसे यांच्याकडे सोपविण्यात आली़मात्र शेवाळे यांना दिल्लीचे तिकीट व प्रभू यांनी मंत्रालयाचा रस्ता धरला़ त्यामुळे या वेळी पहिल्यांदाच शिवसेनेने सभागृह नेतेपद महिलेकडे सोपविले़ आरक्षणामुळे महापौरपदी नवख्या स्नेहल आंबेकर विराजमान झाल्या़ तर सभागृह नेत्या तृष्णा विश्वासराव व स्थायी समिती अध्यक्ष यशोधर फणसे सेनेचा कारभार पालिकेतून हाकत आहेत़हे नेते जुने-जाणते असले तरी प्रभू, शेवाळे यांच्यासारखे आक्रमक नाहीत, असा सूर सेनेच्या गोटातून निघत आहे़ त्यामुळे प्रमोशननंतरही पालिकेत लक्ष घालण्याची वेळ प्रभू, शेवाळेंवर आली आहे़ (प्रतिनिधी)