शिवसेना नगरसेविकेची ठरावाची सूचना
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : महिलांच्या आरोग्याच्या दृष्टीने महत्त्वाचा असलेला मासिक पाळी हा विषय समाजात आजही दुर्लक्षित आहे. आर्थिकदृष्ट्या सॅनिटरी पॅड विकत घेणे परवडत नसल्याने महामुंबईत अनेक महिला आजही मासिक पाळीत कपड्यांचा वापर करतात. त्यामुळे त्यांना मोठ्या प्रमाणात जंतुसंसर्गाला सामोरे जावे लागते, असे वैद्यकीय क्षेत्रातील जाणकारांचे मत आहे.
त्यामुळे मुंबई महानगरपालिकेच्या माध्यमातून सार्वजनिक ठिकाणी स्कॉटलंड देशाप्रमाणे मोफत सॅनिटरी पॅड उपलब्ध करून घ्यावेत, अशी आग्रही मागणी शिवसेनेच्या प्रभाग क्रमांक ७च्या नगरसेविका शीतल म्हात्रे यांनी मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांना एका पत्राद्वारे केली आहे. येत्या महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत आपली ठरावाची सूचना पटलावर ठेवण्यात यावी व सदर अहवाल आयुक्तांना सादर करण्याची आयुक्तांना विनंती करण्यात यावी, असे त्यांनी महापौरांना दिलेल्या पत्रात नमूद केले आहे. आपण याविषयी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनाही पत्र देणार असल्याचे त्यांनी सांगितले.
आजही आपल्या देशात वयोगट १३ ते ५० या मासिक पाळीत मोडणाऱ्या ३३.५ कोटी स्त्रियांपैकी फक्त १५ टक्के स्त्रिया सॅनिटरी पॅडचा वापर करतात. या ३७ वर्षांच्या मासिक पाळीच्या काळात स्त्रियांना २२२० दिवस म्हणजे त्यांच्या आयुष्याची ६ वर्षे मासिक पाळीच्या कालावधीत जातो. आजही जगात या संवेदनशील विषयाकडे गांभीर्याने स्त्रिया पाहत नाहीत. मासिक पाळीत स्त्रिया कपडे, गोणपाट, वाळू, झाडाची पाने तर नैरोबीसारख्या देशात कोंबडीच्या पिसाचा सॅनिटरी पॅड म्हणून वापर करतात, अशी धक्कादायक आकडेवारी नगरसेविका शीतल म्हात्रे यांनी दिली.
--------------------------------------