महापालिकेने जागा द्यावी, आम्ही उभारू ‘मियावाकी जंगल’; तरूणांचा सहभाग लक्षणीय
By ऑनलाइन लोकमत | Published: February 5, 2020 02:26 AM2020-02-05T02:26:52+5:302020-02-05T02:27:34+5:30
मुंबई शहर व उपनगरात वाढत्या लोकसंख्येच्या विस्फोटामुळे जंगल झपाट्याने कमी होत आहे.
मुंबई : मुंबई शहर व उपनगरात वाढत्या लोकसंख्येच्या विस्फोटामुळे जंगल झपाट्याने कमी होत आहे. त्यामुळे प्रदूषण वाढत असून, प्रदूषणाविरोधात लढण्यासाठी मोठ्या प्रमाणात झाडे लावण्याची गरज आहे. मुलुंड पश्चिमेकडील भांडुप कॉम्प्लेक्स येथे ‘ग्रीन यात्रा’ संस्थेतर्फे झाडांची संख्या वाढविण्याच्या उद्देशाने ‘मियावाकी अर्बन डेन्स फॉरेस्ट’ उभारले आहे. १,२०० स्क्वेअर मीटर परिसरात ३ हजार ५०० हून अधिक रोपांची लागवड करण्यात आली आहे. विशेष म्हणजे, ही जागा महापालिकेची आहे. १२ ते १३ स्क्वेअर मीटर परिसरामध्ये हे जंगल पसरले आहे. तिन्ही ऋतुंमध्ये हे जंगल आपले रंग बदलताना दिसून येईल, हे या जंगलाचे वैशिष्ट्ये आहे.
आवळा, कडुनिंब, मोहा, करंज, आंबा, जांभूळ, बदाम, बेल, पेरू, साग, कान्हेर, लिंबू, अडुळसा, रातराणी, कडीपत्ता इत्यादी रोपांची लागवड करण्यात आली आहे. जवळपास ४६ प्रकारच्या विविध प्रजातींची रोपे या मियावाकी जंगलामध्ये लागवड करण्यात आली आहेत. मुख्यत: रोपांमध्ये फुलांची रोपे जास्त प्रमाणात लावण्यात आली आहेत, तसेच आर्किटेक्चर तज्ज्ञांनी ही जागा डिझाइन केली आहे. राम मंदिर स्थानकाजवळ मुंबईतला पहिले मियावाकी जंगल उभारण्यात आले असून, ते आजतागायत जंगल वाढतच आहे, अशी माहिती ग्रीन यात्रा संस्थेचे संस्थापक प्रदीप त्रिपाठी यांनी दिली.
मियावाकी जंगलाला दोन वर्षांनंतर देखभालीची गरजही लागणार नाही. महापालिकेने पडीक जागा आम्हाला देऊन तिथे मोफत मियावाकी जंगल उभारून देऊ, अशी मागणी संस्थेने केली आहे. मियावाकी जंगल निर्माण करण्यासाठी तिथे पाण्याचा मुबलक पुरवठा असणे आवश्यक आहे. मुंबई, पुणे, नागपूर, नवी मुंबई, हैदराबाद, दिल्ली, नोएडा इत्यादी ठिकाणी मियावाकी जंगल निर्माण करण्याचे काम सुरू केले आहे.
मियावाकी जंगलासाठी ३५ कोटी रुपये
जापनीज वनस्पती शास्त्रज्ञ आणि वनस्पती पर्यावरणशास्त्रतज्ज्ञ डॉ.अकिरा मियावाकी यांनी ‘मियावाकी अर्बन डेन्स फॉरेस्ट’ या पद्धतीचा शोध लावला. या पद्धतीचा वापर करून जगभरात तीन हजारांहून अधिक वने यशस्वीरीत्या तयार करण्यात आली आहेत. आता मुंबईमध्येही ही पद्धत वापरून झाडांची संख्या झपाट्याने वाढविण्याचे महापालिकेचे लक्ष्य आहे. यासाठी महापालिका ३५ कोटी रुपये खर्च करणार आहे.