Join us

पालिकेचे धूरवाले झाले गायब; स्वच्छतेकडे लक्ष अन् वाढत्या डासांकडे दुर्लक्ष

By ऑनलाइन लोकमत | Published: January 15, 2024 10:14 AM

स्वच्छ मुंबई अंतर्गत पालिकेने सध्या साफसफाईचा धडाका लावला आहे.

मुंबई : स्वच्छ मुंबई अंतर्गत पालिकेने सध्या साफसफाईचा  धडाका लावला आहे. दर रविवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत विशेष मोहीम राबवली जात आहे. मात्र, डासांच्या वाढत्या प्रादुर्भावाकडे  आणि धूर फवारणीकडे पालिका प्रशासन म्हणावे तसे लक्ष देत नाही. विशेष करून, बांधकामस्थळी धूर फवारणी होतच नसल्याचे निदर्शनास आले आहे. 

मुंबईत सध्या अनेक ठिकाणी विविध प्रकल्पांची कामे सुरू आहेत.  मेट्रो, उड्डाणपूल, रस्ते काँक्रिटीकरणच्या कामांचाही त्यात समावेश आहे. त्याशिवाय विविध भागात पुनर्विकासाची, नव्या इमारती बांधण्याची कामेही मोठ्या प्रमाणावर सुरू आहेत. या ठिकाणी राडारोडा, बांधकाम साहित्य वाहून नेणाऱ्या  अवजड वाहनांची वाहतूक सुरू असते. तसेच चिखलाचे साम्राज्य पसरलेले  असते तर काही ठिकाणी पाणी साचलेले  असते. 

अशा ठिकाणी डासांचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर वाढत आहे.  विक्रोळी कन्नमवार नगरात मोठ्या प्रमाणावर पुनर्वसनाचे प्रकल्प सुरू आहेत. या ठिकाणी असेच चित्र आहे. 

यामुळे थांबली होती धूर फवारणी :-

मध्यंतरीच्या काळात धूर फवारणी  जवळपास ठप्पच पडली होती. धूर फवारणीसाठी आवश्यक  असणाऱ्या कीटकनाशकांचा  साठा संपल्यामुळे, विशिष्ट प्रकारच्या  कीटकनाशकांचा वापर करण्यात अडचण येत असल्याने धूर फवारणी थांबली होती, या अडचणी दूर झाल्या असून, पुन्हा एकदा धूर फवारणी जोरात सुरू झाली आहे, असा दावा पालिकेच्या कीटकनाशक विभागाकडून करण्यात आला होता.

टॅग्स :मुंबईनगर पालिका