मुंबई : नवीन वेतन करार, सदोष बायोमेट्रिक हजेरी पद्धत बंद करणे, वैद्यकीय गटविमा योजना सुरू करणे आदी मागण्यांसाठी महापालिका कर्मचारीही आंदोलनाच्या तयारीत आहेत. या मागण्यांसंदर्भात कामगार संघटनांची पालिका प्रशासनाबरोबर आज मंगळवारी बैठक होणार आहे, तर बुधवारी मोर्चा काढण्यात येणार आहे. मात्र त्यानंतरही वेतनवाढीबाबत निर्णय न झाल्यास गणेशोत्सवानंतर आंदोलनाचा इशारा कामगारांच्या समन्वय समितीने दिला आहे. त्यामुळे बेस्ट कामगारांपाठोपाठ आता पालिका कर्मचारीही संपाच्या तयारीत आहेत.महापालिका कामगार संघटनेच्या समन्वय समितीने १२ जुलै २०१९ रोजी आपल्या विविध मागण्यांसाठी प्रशासनाबरोबर चर्चा केली होती. मात्र त्यानंतरही नवीन वेतन करारासह अन्य मागण्यांबाबत निर्णय झाला नाही. बेस्ट कामगार संघटनाही गेल्या काही दिवसांपासून आपल्या विविध मागण्यांसाठी आक्रमक झाल्या आहेत. नवीन वेतन करारासाठी कृती समितीने बेस्ट प्रशासनाला दोन दिवसांची मुदत दिली आहे. त्यामुळे मंगळवारपर्यंत निर्णय न झाल्यास बेस्ट कामगारांच्या आंदोलनाची दिशा निश्चित होणार आहे. त्याचवेळी पालिका कामगार संघटनाही कार्यरत झाल्या असून बुधवारी पालिका मुख्यालयावर मोर्चा काढण्याचा इशारा मुंबई महानगरपालिका कामगार कर्मचारी संघटना समन्वय समितीने दिला आहे.अशा आहेत मागण्यापालिकेत कामगार कर्मचारी व अधिकाऱ्यांना बायोमेट्रिक हजेरी सक्तीची करण्यात आली आहे. मात्र सदोष यंत्रामुळे कामगारांची गैरहजेरी लागत असून त्यांचे वेतन मोठ्या प्रमाणात कापले जात आहे. त्यामुळे ही हजेरी पद्धतीच बंद करण्याची मागणी कामगार संघटनांनी केली आहे.सहाव्या वेतन आयोगानुसार कामगारांना लागू असलेली सामूहिक गटविमा योजना १ सप्टेंबर २०१९ पासून पुन्हा सुरू करावी.सातव्या वेतन आयोगानुसार वेतनवाढीसह सर्व भत्त्यांमध्ये सुधारणा करण्यासाठी वाटाघाटी समितीची स्थापना करावी. लवकरात लवकर करार करण्यात यावा. १ जानेवारी २०१६ पासून सर्व थकबाकी गणेशोत्सवापूर्वी एकरकमी देण्यात यावी.पालिकेच्या सेवेत ५ मे २००८ नंतर लागलेल्या कर्मचाऱ्यांना पूर्वीच्या कामगार-कर्मचाºयांना मिळणारी पेन्शन योजना पूर्वलक्षी प्रभावाने सुरू करण्यात यावी.
पालिका कर्मचारीही उपसणार संपाचे हत्यार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 27, 2019 1:10 AM