विहीर मालकांना देण्यात येणाऱ्या नोटिसाना पालिकेची १५ जूनपर्यंत स्थगिती
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 11, 2025 21:52 IST2025-04-11T21:51:33+5:302025-04-11T21:52:53+5:30
मुख्यमंत्र्यांच्या सूचनेनंतर पालिका प्रशासनाचा निर्णय, भू नीर प्रणाली संदर्भात जनजागृती करण्याच्या सूचना

विहीर मालकांना देण्यात येणाऱ्या नोटिसाना पालिकेची १५ जूनपर्यंत स्थगिती
लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई: केंद्रीय भू-जल प्राधिकरणाचे बदललेले नियम व त्या पार्श्वभूमीवर यादृष्टिने मुंबईतील टँकरचालकांच्या मागण्या व त्यांचा संप यावर तातडीने तोडगा काढावा. मुंबईतील नागरिकांना उन्हाळ्यात पाणी टंचाईचा सामना करावा लागू नये, याची काळजी घेण्याची सूचना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी पालिका आयुक्त भूषण गगराणी यांना केल्या. शिवाय केंद्रीय जलशक्ती मंत्री चंद्रकांत पाटील यांनी ही भू-नीर' प्रणाली सोप्या करण्याच्या सूचना दिल्या आहेत. या दोन्हीच्या पार्श्वभूमीवर पालिकेने बजावलेल्या नोटीसना ना १५ जून पर्यंत आयुक्त भूषण गगराणी यांनी स्थगिती दिली आहे.
केंद्रीय भू-जल प्राधिकरण यांनी नवीन नियमावली लागू केली आहे. या नियमावलीनुसार सर्व विहीर तसेच कूपनलिका धारकांनी केंद्रीय भू-जल प्राधिकरण यांचे 'ना-हरकत प्रमाणपत्र' प्राप्त करावे, या अनुषंगाने पालिकेकडून मुंबईतील विहीर व कूपनलिका मालकांना नोटीस बजावण्यात आले होते. या नोटीसनंतर पाणी उपलब्धतेमध्ये अडचणी येऊ लागल्याने टँकर चालक संघाने संप पुकारला आहे. या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर, केंद्रीय जलशक्ती मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली मुंबईतील टँकर चालक आणि केंद्रीय भू-जल प्राधिकरण प्रशासन आदींच्या उपस्थितीत वांद्रे-कुर्ला संकुलात शुक्रवारी बैठक पार पडली. या बैठकीस आमदार प्रवीण दरेकर यांच्यासह पालिकेच्या सार्वजनिक आरोग्य विभागाचे उप आयुक्त शरद उघडे, कार्यकारी आरोग्य अधिकारी डॉ. दक्षा शहा, कीटकनाशक अधिकारी चेतन चौबळ उपस्थित होते.
या बैठकीत केंद्रीय भू-जल प्राधिकरणाच्या नियमावलीनुसार खासगी विहीर व कूपनलिका धारकांनी भूजल उपसा करण्यासाठी 'भू-नीर' या ऑनलाईन एक खिडकी प्रणालीवरुन 'ना-हरकत प्रमाणपत्र' ना हरकत प्रमाणपत्र प्राप्त करणे आवश्यक आहे. मात्र, त्यामध्ये नागरिकांना येत असलेल्या अडचणी पाहता ही प्रणाली अधिक सुलभ करण्याचे व त्याविषयी जनजागृती करण्याचे निर्देश केंद्रीय जलशक्ती मंत्री चंद्रकांत पाटील यांनी केंद्रीय भू-जल प्राधिकरण प्रशासनाला दिले आहेत. तसेच या प्रणालीविषयी जास्तीत जास्त जनजागृती करावी. त्याचप्रमाणे 'ना-हरकत प्रमाणपत्र' प्राप्त करण्यासाठी नागरिकांना येणाऱया अडचणी सोडविण्याकरिता केंद्रीय भू-जल प्राधिकरणाच्या अधिकाऱयांनी सहाय्य पुरवावे, असे निर्देश देखील दिले आहेत.
मुख्यमंत्र्यांच्याही सूचना
राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील मुंबईतील टँकरचालकांच्या मागण्या व संप या पार्श्वभूमीवर पालिकेला निर्देश दिले. मुंबईतील टँकरचालकांचा संप सुरु असल्याने काही भागात पाण्याची समस्या निर्माण झाली आहे. उन्हाळ्याचा काळ पाहता ही स्थिती अशीच राहणे योग्य नाही. त्यामुळे बदललेले नियम आणि टँकरचालकांच्या मागण्या यातून सुवर्णमध्य साधत, सामान्य जनतेला त्रास होणार नाही, यादृष्टीने तातडीने तोडगा काढावा असे त्यांनी सूचनांमध्ये नमूद केले.
या पार्श्वभूमीवर पालिकेने समितीचा निर्णय घेतला आहे. तसेच विहीर व कूपनलिकांना परवानगी देण्याविषयीची पालिकेची प्रणाली देखील अधिक सुलभ, सोपी करावी, असे म्हटले आहे. दरम्यान असे असले तरी, विहीर व कूपनलिकांसाठी तसेच भू-जल उपशासाठी आवश्यक त्या सर्व परवानगी प्राप्त करणे बंधनकारक राहील, असेही प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात येत आहे.