मुंबई : वाढत्या जलपर्णीमुळे पवई तलावाच्या सौंदर्याला बाधा निर्माण झाली आहे. त्यामुळे जलपर्णी तसेच तलावातील टाकाऊ पदार्थ काढण्यासाठी मुंबई महापालिकेने पुढाकार घेतला आहे. त्याकरिता हार्वेस्टर यंत्र व एमफिबियस यंत्राच्या मदत घेण्यात येत असून, पालिकेकडून यासाठी ११ कोटींचा खर्च केला जाणार आहे. हे काम पुढील सहा महिन्यांत पूर्ण करण्याची जबाबदारी कंत्राटदारावर असणार आहे.पूर्व उपनगरातील मुख्य पर्यटनस्थळ असलेल्या पवई तलावाचे सुशोभीकरण करून त्याचे रूपडे पालटण्यात आले आहे.
तलावाचा परिसर अत्यंत सुंदर करण्यात आला असून तेथे आकर्षक रोषणाई केली आहे. त्यामुळे तेथे पर्यटकांचा ओढा वाढला आहे. मात्र, जलपर्णी वाढल्याने तलावाचे सौंदर्य बाधित झाले आहे. त्यामुळे तलावाचे सौंदर्य अबाधित राखण्यासाठी तसेच तलावातील जैवविविधता जतन करण्यासाठी संवर्धन करण्यासाठी पालिकेने सफाई मोहीम हाती घेतली आहे. जलपर्णी तसेच टाकाऊ पदार्थ विशिष्ट यंत्रांद्वारे बाहेर काढून त्याची डम्पिंग ग्राउंडवर विल्हेवाट लावली जाणार आहे.
या कामासाठी एस. के. डेव्हलपर्स या कंत्राटदाराची नियुक्ती केली आहे. पालिका या कामासाठी आठ कोटी ३७ लाख रुपये खर्च करणार आहे. पालिका करांसह कंत्राटाला ११ कोटी १८ लाख रुपये मोजणार आहे. जलपर्णी काढण्याचे काम सहा महिन्यांत पूर्ण करणे अपेक्षित आहे. त्यानंतर पुढील १८ महिने तलावाची देखभालही करण्यासाठी कंत्राटदाराची जबाबदारी असणार आहे.
१) तलावातील जैवविविधतेवर परिणाम २०१२ मध्ये पवई तलावातील जलपर्णी काढण्याचे कंत्राट देण्यात आले होते. मात्र, त्यानंतर पुन्हा जलपर्णी वाढली आहे. जलपर्णीमुळे तलावातील जैवविविधतेपर्यंत सूर्यप्रकाश पोहोचण्यात अडथळा निर्माण होतो.
२) माशांचे खाद्य असणाऱ्या वनस्पतींची वाढ खुंटते. तलावातील ऑक्सिजनचे प्रमाण कमी होऊन तापमानात फरक पडतो. डासांची उत्पत्ती होते. तलावातील दूषित पाणी कमी करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत, तसेच सांडपाण्याचा निचरा कमी केला जाणार आहे.