१६ झोपडपट्ट्यांना पालिका देणार वॉशिंग मशिन; २०२४-२५ च्या अर्थसंकल्पात ५१ कोटींची तरतूद
By ऑनलाइन लोकमत | Published: February 6, 2024 10:00 AM2024-02-06T10:00:21+5:302024-02-06T10:01:41+5:30
सुविधा केंद्राच्या माध्यमातून १६ झोपडपट्ट्यांमध्ये ठिकठिकाणी आणखी वॉशिंग मशिन उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत.
मुंबई : सुविधा केंद्राच्या माध्यमातून सुरू झालेल्या या योजनेची व्याप्ती वाढविण्यात आली असून १६ झोपडपट्ट्यांमध्ये ठिकठिकाणी आणखी वॉशिंग मशिन उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत. विशेष म्हणजे या मशीनसाठी सौरऊर्जा वापरली जाणार आहे. या आणि अन्य सुविधांसाठी यंदाच्या अर्थसंकल्पात ५१ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.
लोकशाही आघाडी सरकार सत्तेत होते तेव्हा म्हणजे २०२१ सालापासून पालिकेच्या माध्यमातून सुविधा समुदाय केंद्रांची निर्मिती करण्याचा उपक्रम हाती घेण्यात आला होता. या उपक्रमाचा एक भाग म्हणून धारावीत १११ शौचकुप केंद्राची उभारणीचे काम सुरू झाले होते. याच कालावधीत घाटकोपरमधील जगदुशा नगर येथे दुमजली समुदाय केंद्र उभारण्यात आले होते. मुंबईत एकूण सहा सुविधा समुदाय केंद्रे उभारण्याचा संकल्प सोडण्यात आला होता.
वर्दळीच्या १८ ठिकाणी अत्याधुनिक प्रसाधनगृहे उभारण्याचा निर्णय पालिकेने घेतला आहे. त्यासाठी ७८ कोटी रुपये खर्च केले जाणार आहेत. हाजी अली, वरळी , माहीम, मुलुंड, माहीम, वांद्रे या वर्दळीच्या ठिकाणी प्रसाधनगृहे बांधली जाणार आहेत. मुंबईत आणखी १४ हजार १६६ सार्वजनिक तसेच सामूहिक प्रसाधनगृहांची प्रस्तावाला मजुरी देण्यात अली आहे.
३५ दशलक्ष लीटर पाणीबचत :
पाच केंद्रांमध्ये आतापर्यंत ३५ दशलक्ष लीटर पाण्याची बचत करण्यात आली असून, गरजू घटकांना स्वच्छ , सुरक्षित दुर्गंधीमुक्त अशी प्रसाधनगृहे उपलब्ध व्हावीत, पिण्याचे शुद्ध पाणी मिळावे , कपडे धुण्याची सुविधा मिळावी, या दृष्टीने सुविधा केंद्राची उभारणी करण्यात आली आहे.
प्रत्येक केंद्रामध्ये वर्षाला सुमारे २० हजार याप्रमाणे पाच केंद्रांमध्ये मिळून सुमारे एक लाख नागरिक सुविधांचा लाभ घेत आहेत.