सेव्हन हिल्स रुग्णालयाची जागा पालिका ताब्यात घेणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 7, 2019 03:12 AM2019-08-07T03:12:11+5:302019-08-07T03:12:25+5:30
दहा वर्षांनंतर कार्यवाहीला वेग
मुंबई : अंधेरी येथील सेव्हन हिल्स रूग्णालय चालविण्यास घेणाऱ्या व्यवस्थापनाने महापालिकेचे नियम मोडले. नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी महापालिका आणि संबंधित रूग्णालय व्यवस्थापनाबरोबर वाद निर्माण झाला. त्यामुळे रूग्णालयाची जागा ताब्यात घेण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे.
अंधेरी पूर्व, मरोळ येथे पालिकेच्या मालकीची ७७ हजार ५५ चौरस मीटर जागा आहे. या जागेवर कॅन्सरग्रस्तांसाठी रूग्णालय उभारण्याचा पालिका प्रशासनाने निर्णय घेतला होता. मात्र सन २००९-१० मध्ये कॅन्सर रुग्णालयाचा प्रस्ताव रद्द करीत ही जागा सेव्हन हिल्स रुग्णालय प्रशासनाला अटीशर्तीवर देण्यात आली. यामध्ये पालिका रुग्णालयातून येणाºया रूग्णांसाठी २० टक्के खाटा आरक्षित ठेवणे, आजी व माजी नगरसेवक, कर्मचारी आर्थिकदृष्ट्या मागासलेल्या वर्गासाठी २० टक्के खाटा आरक्षित ठेवणे या अटींचा समावेश होता. मात्र रूग्णालयाची जागा ताब्यात येताच सेव्हन हिल्स रुग्णालय व्यवस्थापनाने अनेक नियमांचे उल्लंघन केल्याचा आरोप नगरसेवकांनी केला़
एवढेच नव्हे तर पालिकेचे १४०.८८ कोटी रूपयेही थकविल्यामुळे रुग्णालयाची जागा पालिकेने ताब्यात घ्यावी, अशी मागणी नगरसेवकांकडून केली जात होती.
सन २००५ मध्ये महापालिकेने ७० हजार चौ.मी.चा अंधेरी येथील भूखंड सेव्हन हिल्स हेल्थ केअरला दिले. दीड हजार खाटा असलेले हे रूग्णालय ३० वर्षांच्या करारावर सार्वजनिक खाजगी तत्वावर महापालिकेने संबंधित कंपनीला दिले होते. मात्र २० टक्के गरीब रुग्णांना मोफत उपचार देण्याच्या अटीचे रुग्णालय व्यवस्थापनाने पालन केले नाही. त्यामुळे हे रूग्णालय खाजगी कंपनीला चालविण्यास देण्याचे उद्दिष्ट असफल झाले होते.