तुंबलेल्या ठिकाणांचा पालिका घेणार आढावा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 25, 2020 01:11 AM2020-09-25T01:11:06+5:302020-09-25T01:11:29+5:30
पावसाने काढले वाभाडे : पूरमुक्तीसाठी भूमिगत पाण्याच्या टाक्यांचा पर्याय
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : गेल्या काही वर्षांमध्ये हवामानात बदल झाल्यामुळे पावसाळ्यातील शेवटच्या दोन महिन्यांतच वर्षभराचा पाऊस होत आहे. या अतिवृष्टीत ब्रिमस्टोवॅडसारखे प्रकल्प व अन्य उपाययोजना कुचकामी ठरत आहेत.
त्यामुळे मुंबईची पुरातून सुटका करण्यासाठी टोकियो शहराच्या धर्तीवर भूमिगत पाण्याच्या टाक्या तयार करण्याचा पर्याय पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. दरम्यान, बुधवारी मुंबईवर ओढवलेल्या पूरपरिस्थितीचा अभ्यास करून त्यावर तोडगा काढण्याचा प्रशासनाचा प्रयत्न सुरू आहे.
मुंबईत गेल्या काही वर्षांमध्ये काँक्रिटीकरणचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे पावसाचे पाणी मुरण्यासाठी जागाच उरलेली नाही. अनेक ठिकाणी विकासकामाच्या नावाखाली मोकळा जागांवर काँक्रिटचे अतिक्रमण झाले आहे. त्यामुळे ब्रिमस्टोवॅड प्रकल्पांतर्गत पावसाचे पाणी वाहून नेण्याची पर्जन्य वाहिन्यांची क्षमता वाढवल्यानंतरही पाणी तुंबण्याचे ठिकाण वाढतच असल्याचे आढळून आले आहे. काही भागांमध्ये पहिल्यांदाच पाणी तुंबत असल्याचेही यंदा दिसून आले.
याची गंभीर दखल प्रशासनाने घेतली आहे. ज्या भागात पाणी साचले त्या ठिकाणाचा आढावा घेऊन पाणी तुंबण्यामागचे कारण, तसेच पाणी निचरा होण्यास जास्त वेळ का लागला? याचा अभ्यास करून त्यावर उपाय केला जाणार आहे, असे पालिकेतील एका अधिकाऱ्याने सांगितले. पावसाचे पाणी साठविण्यासाठी टोकियो शहराप्रमाणे भूमिगत पाण्याची टाकी बांधण्याचे प्रयत्न प्रशासकीय पातळीवर सुरू आहेत. यासाठी जपानमधील तज्ज्ञ महापालिकेला मार्गदर्शन करणार आहेत.
मोकळ्या जागांवर काँक्रिटचे अतिक्रमण झाले आहे. त्यामुळे ब्रिमस्टोवॅड प्रकल्पांतर्गत पर्जन्य वाहिन्यांची क्षमता वाढवल्यानंतरही पाणी तुंबण्याचे ठिकाण वाढतच असल्याचे आढळून आले आहे.