महापालिका ‘पेनिसुला ग्रँड मार्केट’ ताब्यात घेणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 4, 2017 06:49 AM2017-12-04T06:49:27+5:302017-12-04T06:49:38+5:30
साकीनाका विभागातील ग्रँड पेनिसुला मार्केट मुंबई महापालिका ताब्यात घेण्यात येणार आहे. महापालिकेच्या बाजार विभागाच्या ७ आॅक्टोबर २०१७ रोजीच्या पत्रानुसार, १५ दिवसांच्या आत मार्केटची जागा रिकामी करणे
मुंबई : साकीनाका विभागातील ग्रँड पेनिसुला मार्केट मुंबई महापालिका ताब्यात घेण्यात येणार आहे. महापालिकेच्या बाजार विभागाच्या ७ आॅक्टोबर २०१७ रोजीच्या पत्रानुसार, १५ दिवसांच्या आत मार्केटची जागा रिकामी करणे आणि साहित्य काढून घेण्याचे आदेश देण्यात आले आहेत. महापालिकेने वारंवार जागेची पाहाणी केल्यानंतर हा निर्णय घेतला आहे.
महापालिकेचे लायसेन्स घेण्यात आलेले नाही. येथे अनधिकृत बांधकाम करण्यात आले आहे. पालिकेने ३० जानेवारी २०१५ रोजी नोटीस जारी केली होती. त्यानंतर, ५ मे २०१७ रोजी नोटीस जारी केली होती. पालिकेने २० मार्च २०१५, १३ एप्रिल २०१७, १५ जून २०१७ आणि १० आॅगस्ट २०१७ अशी ४ वेळा जागेची पाहाणी करत, तेथे मार्केट सुरू करण्याची सूचना केली, पण त्यास दाद देण्यात आलेली नाही. परिणामी, सहायक आयुक्तांनी पश्चिम उपनगराच्या अतिरिक्त आयुक्तांना याबाबत प्रस्ताव सादर करत, सदर मार्केट ताब्यात घेण्यासाठी लीज रद्द करण्याची परवानगी मागितली. अतिरिक्त आयुक्तांनी १६ सप्टेंबर २०१७ रोजी परवानगी देताच, महापालिकेच्या बाजार विभागाने येथील जागा रिकामी करत, साहित्य काढण्याचे आदेश दिले आहेत, अशी माहिती, माहिती अधिकार कार्यकर्ते अनिल गलगली यांनी दिली.