Join us

काँक्रीटच्या जंगलाला चढणार हिरवाईचा साज; पालिकेचा ग्रीनिंग मुंबई उपक्रम

By ऑनलाइन लोकमत | Published: December 19, 2023 9:38 AM

‘ग्रीनिंग मुंबई’ ही  माहिती पुस्तिका मुंबईकरांना याकामी पुढाकार घेण्यास प्रोत्साहन देईल.

मुंबई :मुंबईकरांच्या घराची बाल्कनी, इमारतींचे छत, गृहनिर्माण संस्थांचे आवार हिरवेगार करण्याच्या दृष्टीने मुंबई महापालिकेने पुढाकार घेतला आहे. त्यामुळे येत्या काळात या या ठिकाणांवर हिरवीगार झाडे डोलताना दिसली तर आश्चर्य वाटायला नको. ‘ग्रीनिंग मुंबई’ ही  माहिती पुस्तिका मुंबईकरांना याकामी पुढाकार घेण्यास प्रोत्साहन देईल.

मुंबईतील घरांची बाल्कनी, इमारतींचे छत, गृहनिर्माण संस्थांचे आवार, लहान लहान बगीचे आदी ठिकाणी कमीत कमी जागेत विविध प्रकारची रोपटी, झाडे, फुल-फळ झाडे कशी लावावीत, यासाठी  महानगरपालिकेने ‘’डब्ल्यूआरआय इंडिया’’ या संस्थेच्या सहकार्याने ‘ग्रीनिंग मुंबई’ ही  मार्गदर्शक पुस्तिका प्रसिद्ध केली आहे.  

पुस्तिकेचे प्रकाशन अतिरिक्त आयुक्त अश्विनी भिडे यांच्या हस्ते  सोमवारी करण्यात आले. यावेळी. उद्यान अधीक्षक जितेंद्र परदेशी, उपअधीक्षक ज्ञानदेव मुंडे, ‘डब्ल्यूआरआय इंडिया’च्या कार्यक्रम प्रमुख लुबैना रंगवाला, ‘ओइकोस फॉर इकोलॉजिकल सर्व्हिसेस, ट्रान्सफॉर्मिंग’च्या कीर्ति वाणी आदींची उपस्थिती होती.

पुस्तिका केली तयार  :

मुंबई महानगरात वृक्षवल्ली अधिकाधिक बहरावी आणि त्या निमित्ताने पर्यावरण संतुलन टिकून राहावे यासाठी महानगरपालिका अनेक उपक्रम हाती घेत असते. मुंबईत मुळातच जागेची कमतरता असल्याने येथे उपलब्ध जागेचा जास्तीत जास्त वापर कसा करता येईल, यासाठी प्रयत्न सुरू असतात. याच प्रयत्नातून महानगरपालिकेने ‘ग्रीनिंग मुंबई’ ही माहिती पुस्तिका तयार केली आहे. या माहिती पुस्तिकेत पर्यावरणविषयक शास्त्रीय माहिती आहे.

असे नोंदवा आपले मत :

या माहिती पुस्तिकेची ऑनलाइन लिंक http://surl.li/ojnfk असून, माहिती पुस्तिका पीडीएफस्वरूपात डाउनलोड करता येऊ शकते. त्यातील पृष्ठ क्रमांक चारवरील क्यूआर कोड स्कॅन केल्यानंतर  मुंबईकर या पुस्तिकेबाबत आपली मते नोंदवू शकतात. अंतिम सूचनांचा समावेश करून दिनांक  ८ मार्च २०२४ रोजी या पुस्तिकेची सर्व समावेशक आवृत्ती उपलब्ध करून देण्यात येईल.

टॅग्स :मुंबईनगर पालिका