Join us  

प्रदूषणमुक्तीसाठी पालिकेचा नवा प्रयोग; आता दर शनिवारी शहर होणार चकाचक

By ऑनलाइन लोकमत | Published: December 08, 2023 9:42 AM

महापालिका आता मुंबईत दर शनिवारी संपूर्ण स्वच्छता मोहीम राबवणार आहे.

मुंबई : महापालिका आता दर शनिवारी संपूर्ण स्वच्छता मोहीम राबवणार असून, त्या दृष्टीने मार्गदर्शक तत्त्वे जारी केली जाणार आहेत. या मोहिमेला आणखी गती देण्यासाठी पालिका आयुक्त इकबालसिंह चहल यांनी गुरुवारी अधिकाऱ्यांची बैठक घेतली. त्यावेळी मोहिमेची रूपरेषा स्पष्ट केली. तसेच कृती आराखडा तयार करून स्वच्छतेची कार्यवाही केली जाईल, असेही स्पष्ट केले आहे.

मागील शनिवारी मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत ‘डी’ वॉर्ड आणि धारावीत संपूर्ण स्वच्छता मोहीम राबवण्यात आली होती. येत्या शनिवारी राबविल्या जाणाऱ्या संपूर्ण स्वच्छता मोहिमेंतर्गत निवडलेल्या विभागातील रस्ते, पदपथ धूळमुक्त करण्याबरोबरच दुभाजकांची स्वच्छता, सार्वजनिक भिंती, कचराकुंड्यांची स्वच्छता, बेवारस वाहनांची विल्हेवाट, विनापरवाना जाहिरात फलकांवर कारवाई, सार्वजनिक प्रसाधनगृहांची स्वच्छता आणि निर्जंतुकीकरण,  फेरीवाला विरहित क्षेत्र, राडारोडामुक्त परिसर आदींवर कार्यवाही केली जाणार आहे.  संपूर्ण स्वच्छता मोहिमेसाठी मार्गदर्शक तत्त्वे लवकरच जारी करण्यात येतील. 

बीएमसीचा दावा:

वातावरणीय बदलांमुळे मुंबईत वाढलेले हवा प्रदूषण नियंत्रित करण्यासाठी महापालिकेने मार्गदर्शक तत्त्वांची प्रभावीपणे अंमलबजावणी केली. त्यामुळे हवा प्रदूषण कमी झाले. हवा गुणवत्ता निर्देशांक (एक्यूआर) सुधारला, असा दावा महापालिकेने केला आहे.

...तर कंत्राटदारांवर हाेणार कारवाई

सार्वजनिक प्रसाधनगृहांच्या पुनर्बांधणीचे काम निर्धारित कालावधीत पूर्ण न करणाऱ्या अथवा कामात कुचराई करणाऱ्या कंत्राटदारांना काळ्या यादीत टाका, असे निर्देश पालिका आयुक्त चहल यांनी दिले आहेत. पालिकेने मोठ्या प्रमाणावर प्रसाधनगृहांच्या पुनर्बांधणीचे काम हाती घेतले आहे.

टॅग्स :मुंबईनगर पालिका