मरीन ड्राईव्ह परिसरात पालिकेची रात्रभर स्वच्छता मोहीम

By सीमा महांगडे | Published: July 5, 2024 01:04 PM2024-07-05T13:04:42+5:302024-07-05T13:05:29+5:30

महानगरपालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागाच्यावतीने या स्वच्छता मोहिमेतून दोन मोठे डंपर आणि पाच लहान जीप भरून अतिरिक्त कचरा संकलित करण्यात आला. 

Municipality's overnight cleanliness drive in Marine Drive area | मरीन ड्राईव्ह परिसरात पालिकेची रात्रभर स्वच्छता मोहीम

मरीन ड्राईव्ह परिसरात पालिकेची रात्रभर स्वच्छता मोहीम

मुंबई - टी २० क्रिकेट विश्वचषक- २०२४ विजेत्या भारतीय संघाच्या स्वागतासाठी मुंबईतील मरीन ड्राईव्ह परिसरात गुरुवारी रात्री उशिरापर्यंत लाखोंच्या संख्येने क्रिकेटप्रेमी उपस्थित होते. स्वागत सोहळा आटोपून ही गर्दी ओसरल्यानंतर पालिकेच्या माध्यमातून संपूर्ण मरीन ड्राईव्ह परिसरात रात्रभर विशेष स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. मरीन ड्राईव्ह परिसरात दररोज सकाळी चालण्यासाठी नित्यनेमाने येणाऱया मुंबईकरांसाठी हा सर्व परिसर संपूर्ण स्वच्छ स्वरूपात उपलब्ध करुन देण्यात आला. महानगरपालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागाच्यावतीने या स्वच्छता मोहिमेतून दोन मोठे डंपर आणि पाच लहान जीप भरून अतिरिक्त कचरा संकलित करण्यात आला. 

मरीन ड्राईव्ह परिसरात दररोज सकाळी चालण्यासाठी येणाऱया (मॉर्निंग वॉक) मुंबईकरांची कोणतीही गैरसोय होवू नये, यासाठी मरीन ड्राइव्ह परिसरात ही विशेष स्वच्छता मोहीम राबविण्याच्या सूचना पालिका आयुक्त भूषण गगराणी आणि अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त डॉ. सुधाकर शिंदे यांना दिल्या होत्या. त्यानुसार संपूर्ण रात्रभर पालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागाने स्वच्छता मोहीम राबवली. रात्री उशिरापर्यंत भारतीय पुरुष क्रिकेट संघाच्या स्वागतासाठी थांबलेली गर्दी ओसरु लागताच तातडीने स्वच्छता मोहीम सुरु करण्यात आली. ए विभागाचे सहायक आयुक्त जयदीप मोरे यांच्या देखरेखीखाली या संपूर्ण परिसरात स्वच्छता करण्यात आली. 

वस्तू पुनर्प्रक्रियेसाठी पाठवणार

 ए विभागाच्या घनकचरा व्यवस्थापन विभागाच्या सुमारे १०० कामगारांनी, स्वयंसेवी संस्थांच्या कामगारांच्या मदतीने केलेल्या या कार्यवाहीतून एक कॉम्पॅक्टर आणि एक डंपर कचरा संकलित झाला. त्यासोबतच छोट्या पाच जीप भरून कचरा संकलन करण्यात आले. रात्री सुमारे ११.३० पासून सुरु झालेली ही कार्यवाही सकाळी ८ वाजेपर्यंत निरंतर सुरु होती. परिणामी, मॉर्निंक वॉकसाठी येणाऱया मुंबईकरांना स्वच्छ मरीन ड्राईव्ह उपलब्ध झाला.

या स्वच्छता मोहिमेतून खाद्यपदार्थांचे वेष्टन (रॅपर्स), पाण्याच्या बाटल्या, पिशव्या, यासह बूट, चप्पल आणि इतर वस्तू देखील मोठ्या प्रमाणात संकलित करण्यात आल्या. या संकलित कचऱयापैकी सुमारे ५ जीप भरुन संकलित बूट, चप्पल व इतर पुनर्प्रक्रिया योग्य वस्तू इत्यादी क्षेपणभूमीवर न पाठवता त्या पुनर्प्रक्रियेसाठी देण्यात येणार आहेत.

Web Title: Municipality's overnight cleanliness drive in Marine Drive area

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Mumbaiमुंबई