मुंबई : मलेरिया आणि डेंग्यूचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी मुंबई महापालिकेच्या सार्वजनिक आरोग्य विभागाने महापालिका कार्यक्षेत्रात जानेवारी २०२३ ते ३० सप्टेंबर २०२३ या ९ महिन्यांच्या कालावधीत राबवलेल्या शोध मोहिमेत डेंग्यू आणि मलेरिया डासांची १ लाख ६ हजार ८९८ उत्पत्ती स्थळे नष्ट केली आहेत
घरामध्ये अथवा घराशेजारील परिसरामध्ये डासांची उत्पत्ती होऊ नये याकरिता घ्यावयाच्या काळजीसाठी नागरिकांनी मोबाइलमध्ये ‘मुंबई अगेन्स्ट डेंग्यू’ हे ॲप डाउनलोड करून घ्यावे, असे अतिरिक्त महापालिका आयुक्त सुधाकर शिंदे यांनी सांगितले.
डेंग्यूची उत्पत्ती स्थळे
कीटकनाशक विभागाने जानेवारी २०२३ ते ऑक्टोबर २०२३ या ९ महिन्यांच्या कालावधीत डेंग्यूच्या ९४ हजार ९९७ डासांची उत्पत्ती स्थळे नष्ट केली. यासाठी १ कोटी २७ लाख ५ हजार ३८६ घरांना भेटी देऊन, तेथील १ कोटी ९९ लाख ७ हजार ८२२ कंटेनरची तपासणी केली.
२०२२ मध्ये ८३ लाख ९४ हजार ५३० घरांना भेटी देऊन ५३ हजार ४९६ डासांची उत्पत्ती स्थळे नष्ट करण्यात आली होती. २०२१ मध्ये ८१ लाख ६६ हजार १३ घरांना भेटी देऊन ४६ हजार २५९ डासांची उत्पत्ती स्थळे नष्ट केली होती.
मलेरिया उत्पत्ती स्थळे
डेंग्यूसोबत मलेरियाला कारणीभूत असलेल्या ॲनोफिलीस या डासांची उत्पत्ती स्थळेदेखील नष्ट केली आहेत. जानेवारी २०२३ ते ऑक्टोबर २०२३ या ९ महिन्यांच्या कालावधीत ११ हजार ७०१ मलेरियाच्या डासांची उत्पत्ती स्थळे नष्ट केली.
यासाठी २० लाख ३ हजार २७४ घरांना भेटी दिल्या. २०२२ मध्ये ३० हजार ९२ घरांना भेटी देऊन ८ हजार १९५ डासांची उत्पत्ती स्थळे नष्ट केली होती.
तर २०२१ मध्ये ३७ हजार ६१४ घरांना भेटी देऊन ८ हजार ८५६ डासांची उत्पत्ती स्थळे नष्ट करण्यात आली होती.