मुंबई : ‘वैष्णव जन तो तेणे कहियेजे’ या गांधीजींच्या भजनाने रविवारी गेट वे आॅफ इंडियाचा परिसर रविवारी गांधीमय झाला. विद्यार्थ्यांनी ‘मुनीजन’ भजनसंध्येत अहिंसा आणि बंधुत्वाचा संदेश देणारी भजने सादर करत उपस्थितांना मंत्रमुग्ध केले. विश्व अहिंसा दिन, राष्ट्रपिता महात्मा गांधी जयंती आणि लाल बहादूर शास्त्री यांच्या जयंतीचे औचित्य साधत अहिंसा आणि विश्वबंधुत्वाचा संदेश देण्यासाठी मुंबई विद्यापीठाचा विद्यार्थी कल्याण विभाग, सांस्कृतिक विभाग, संगीत विभाग, लोककला अकादमी, आजीवन अध्ययन विभाग, एनएसएस आणि एनसीसी विभागातर्फे ‘मुनीजन’ भजनसंध्येचे आयोजन रविवारी सायंकाळी गेट वे आॅफ इंडिया येथे केले होते. या भजनसंध्येचे उद्घाटन उच्च व तंत्रशिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी केले. याप्रसंगी मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. संजय देशमुख, अभिनेत्री जुई गडकरी, गायिका वैशाली भैसने-माडे, गायिका योगिता चितळे उपस्थित होत्या. या मान्यवरांनी विद्यार्थ्यांसोबत भजने सादर केली. या भजनसंध्येसाठी मुंबईतील विविध महाविद्यालयांचे २ हजारहून अधिक विद्यार्थी उपस्थित होते.
गेट वे आॅफ इंडिया येथे रंगली मुनीजन भजनसंध्या
By admin | Published: October 04, 2016 2:55 AM