महामारीतही मुन्नाभाई एमबीबीएस जोरात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 27, 2021 04:06 AM2021-06-27T04:06:20+5:302021-06-27T04:06:20+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : कांदिवलीतील एका उच्चभ्रू सोसायटीत लसीकरणाचा घोटाळा समोर आल्यानंतर बोगस डॉक्टरांचा विषयही पुन्हा चर्चिला जाऊ ...

Munnabhai MBBS loud even in epidemic | महामारीतही मुन्नाभाई एमबीबीएस जोरात

महामारीतही मुन्नाभाई एमबीबीएस जोरात

Next

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : कांदिवलीतील एका उच्चभ्रू सोसायटीत लसीकरणाचा घोटाळा समोर आल्यानंतर बोगस डॉक्टरांचा विषयही पुन्हा चर्चिला जाऊ लागला आहे. कोरोनासारख्या वैश्विक महामारीच्या काळातही मुंबई आणि महानगर परिसरात बोगस डॉक्टरांचा सुळसुळाट सुरू असल्याची माहिती समोर आली आहे.

दादरमधील एका बोगस डॉक्टराने तब्बल १ हजारांहून अधिक शस्त्रक्रिया केल्याचे समोर आले आहे. एका टॅक्सीवाल्यावर केलेली शस्त्रक्रिया अयशस्वी ठरल्यानंतर त्याचा प्रताप उघडकीस आला. परंतु, हा केवळ एक नमुना असून मुंबईत अशा मुन्नाभाई एमबीबीएसचा व्यवसाय जोरात सुरू असल्याची माहिती एका ज्येष्ठ आरोग्य तज्ज्ञांनी दिली. त्यांच्या म्हणण्यानुसार मुंबईतील लहानमोठ्या विभागांत तपासणी केल्यास प्रत्येक ठिकाणी किमान दोन-तीन बोगस डॉक्टर निघतील. कोरोनाकाळात रुग्णांच्या जीवाशी खेळणाऱ्या जवळपास ३० मुन्नाभाईंना पोलीस आणि आरोग्य विभागाच्या पथकाने बेड्या ठोकल्याची माहितीही त्यांनी दिली.

...........

दवाखान्यात जाण्यापूर्वी खात्री करा

१) एखाद्या तज्ज्ञ डॉक्टराच्या हाताखाली कम्पाउंडर किंवा परिचारक म्हणून काम केलेल्या काही व्यक्तींनी बोगस दवाखाने उघडल्याचे गेल्या काही वर्षांत समोर आले आहे. कुठूनतरी बनावट प्रमाणपत्र मिळवायचे आणि स्वतःचा दवाखाना सुरू करायचा, अशी त्यांची कार्यपद्धती असते. थोडेफार संशयित वातावरण वाटल्यास दवाखाना दुसऱ्या शहरात स्थलांतरित करून बिनदिक्कत रुग्णांच्या जीवाशी खेळ करून बक्कळ पैसा ते कमावतात.

२) काही वर्षे तज्ज्ञांच्या हाताखाली काम केलेले असल्याने हे बोगस डॉक्टरही त्यांच्याइतकेच तज्ज्ञ असतात. साध्या सर्दीतापापासून लहानसहान शस्त्रक्रिया ते सहज करू शकतात. त्यामुळे बोगस डॉक्टर ओळखणे कठीण असते.

३) अशावेळी वैद्यकीय प्रमाणपत्र हेच त्यांना बोगस सिद्ध करण्याचे प्रमुख हत्यार असते. रुग्णांनी डॉक्टरकडे जाण्यापूर्वी पुरेपूर खात्री करून घ्यावी. खोट्या प्रमाणपत्रांआधारे प्रॅक्टीस करणारा औषधांची नावे किंवा आजाराचे वैद्यकीय नाव उच्चारताना बऱ्याचदा गफलत करतो. असा प्रकार तुमच्यासोबत घडल्यास तत्काळ पोलीस स्थानकात कळवा.

....................

तक्रार आली तरच कारवाई

बोगस डॉक्टरांचा शोध घेण्यासाठी वैद्यकीय परिषद किंवा आरोग्य विभाग बऱ्याच मोहिमा हाती घेतात. परंतु, त्याबाबत बऱ्याच जणांना पूर्वकल्पना असल्याने ते सावध राहतात. धाड किंवा अनपेक्षित तपासणी केल्यास बोगस डॉक्टर हाती लागतात. परंतु, त्यासाठी तक्रार दाखल होणे गरजेचे असते, अशी माहिती आरोग्य क्षेत्रातील तज्ज्ञांनी दिली.

..........

कोरोनाकाळात किती बोगस डॉक्टरांची धरपकड – ३०

विनापरवाना सुरू असलेल्या दवाखान्यांवर कारवाई - १२

Web Title: Munnabhai MBBS loud even in epidemic

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.