मुंबई : मरोळ येथे सशस्त्र पोलीस मुख्यालय आणि पोलीस वसाहतीची संरक्षक भिंत मोडकळीस येण्यापासून वसाहतीतील रस्त्यांवरील खड्डे, पिण्याचे गढूळ पाणी यांसारख्या समस्यांनी येथील रहिवासी बेजार झाले आहेत. या समस्यांकडे सार्वजनिक बांधकाम विभागाचे लक्ष वेधण्यात आले आहे.मरोळ येथे सशस्त्र पोलीस मुख्यालय, पोलीस प्रशिक्षण केंद्र तसेच पोलीस वसाहतही आहे. हे सशस्त्र पोलीस मुख्यालय असल्याने या ठिकाणी मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा आहे. म्हणूनच हा परिसर अत्यंत संवेदनशील आहे. मात्र या पोलीस वसाहतीभोवतालची संरक्षक भिंत पूर्णपणे मोडकळीस आली आहे. अनेक ठिकाणी मोठमोठी भगदाडे पडली आहेत तर काही ठिकाणी ती पार ढासळली आहे. या मोडकळीस आलेल्या संरक्षक भिंतीचा गैरफायदा घेऊन पोलीस वसाहतीत चोरांच्या घुसखोरीचे प्रमाण वाढलेले आहे. तसेच या वसाहतीला लागून जंगल परिसर असल्याने तिथून जंगली जनावरे आत शिरून जीवितहानी होण्याची भीती पोलीस कुटुंबीयांकडून वर्तवण्यात येते.मोडकळीस आलेल्या या संरक्षक भिंतीचा फायदा घेत सशस्त्र पोलीस मुख्यालयावर अतिरेकी हल्ला होण्याची शक्यता नाकारता येत नाही. याचे गांभीर्य लक्षात घेऊन ही संरक्षक भिंत त्वरित बांधण्यात यावी, असे निवेदन मनसेचे उपविभाग अध्यक्ष रोहन विजय सावंत यांनी सार्वजनिक बांधकाम मंत्री आणि या विभागाचे उप विभागीय अभियंत्यांना सादर केले आहे. याचबरोबर वसाहतीमधील अंतर्गत रस्त्यांची दुरवस्था झाली असून, जागोजाग खड्ड्यांचे साम्राज्य पसरलेले आहे. त्यामुळे पोलीस कुटुंबीयांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागते. वसाहतीत पिण्याचे पाणी गढूळ येत असल्याने आजारांचेही प्रमाण वाढल्याचे सावंत यांनी सांगितले.या पोलीस वसाहतीच्या आवारात जंगली श्वापदांचे प्रमाण खूपच वाढले आहे. यात विषारी सापांचे प्रमाण अधिक आहे. आवारात अनेक ठिकाणी कचऱ्याचे ढीग पसरले आहेत तसेच जंगली झाडे व गवत उगवलेले असून, अनेक वर्षे वृक्षछाटणी न झाल्याने झाडे घरांवर पडण्याची स्थिती निर्माण झाली आहे. आवारात सर्वत्र उंदीर आणि घुशींनी मातीचे ढिगारे उपसून आपले साम्राज्य पसरवले आहे. या उंदरांमुळेच विषारी सापांचे प्रमाणही वाढले असून, त्यामुळे पोलीस कुटुंबीयांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.
मरोळ मुख्यालयाची दुरवस्था
By admin | Published: June 25, 2016 2:15 AM