शिवीगाळ करणाऱ्या मित्राची हत्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 9, 2021 04:06 AM2021-07-09T04:06:27+5:302021-07-09T04:06:27+5:30
पोलिसांकडून एकाला अटक लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : स्वतःच्या घरच्यांनी ज्याला हाकलून दिले, अशा मित्राला राहायला स्वतःच्या घरी आसरा ...
पोलिसांकडून एकाला अटक
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : स्वतःच्या घरच्यांनी ज्याला हाकलून दिले, अशा मित्राला राहायला स्वतःच्या घरी आसरा दिला तोच सतत शिवीगाळ करून बदनाम करू लागला. त्यामुळे संतप्त झालेल्या व्यक्तीने त्या मित्रावर कोयत्याने हल्ला करत त्याला ठार मारले. याप्रकरणी कांदिवली पोलिसांनी गुरुवारी मारेकऱ्याला अटक केली आहे.
शंकर कप्पूस्वामी (४६) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे. तो व्यवसायाने रिक्षाचालक असून, कांदिवली रेल्वेस्थानक परिसरातील झोपडपट्टीत राहतो. मृत विनोद मुदलीयार (३६) हा देखील त्याच परिसरात आई, बहीण आणि कुटुंबासोबत राहत होता. मुदलीयार हा बेरोजगार असून, त्याला दारूचे व्यसन होते. त्यामुळे त्याची पत्नीही त्याला सोडून गेली. नशेत तो घरच्यांना शिवीगाळ करायचा, त्यामुळे त्याला त्यांनी घरातून हाकलून दिले. कप्पूस्वामीच्या पत्नीचेही बऱ्याच वर्षांपूर्वी निधन झाले. तो घरात एकटाच राहत असल्याने महिनाभरापासून कप्पूस्वामीने स्वतःच्या घरी मुदलीयार याला आसरा दिला होता. मात्र, मुदलीयार याने त्याचे घर बळकावण्याचा प्रयत्न केला आणि त्या रागात कप्पूस्वामीनेही त्याला घराच्या बाहेर काढले. त्यानंतर मुदलीयार हा कप्पूस्वामीच्या घरासमोरील एका टेम्पोमध्ये झोपत होता. मात्र, नेहमी तो दारू पिऊन यायचा आणि कप्पूस्वामीला शिवीगाळ करायचा. त्यावरून त्यांच्यात रोज भांडण व्हायचे. बुधवारी रात्रीही साडेअकराच्या सुमारास त्यांच्यात भांडण झाले. त्यानंतर कप्पूस्वामी रात्री दीडच्या सुमारास दारू पिऊन आला आणि घरातून कोयता आणून मुदलीयारवर वार केले. त्यात मुदलीयार गंभीर जखमी झाला. त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले असता, उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाला. स्थानिकांनी याची माहिती कांदिवली पोलिसांना दिली. ‘आम्ही याप्रकरणी कप्पूस्वामी याला अटक केली असून, त्याच्यावर खुनाचा गुन्हा नोंद केला आहे’, अशी माहिती कांदिवली पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक बाबासाहेब साळुंखे यांनी दिली.