‘गुन्हेगार वॉच पेट्रोलिंग’मध्ये हत्येतील आरोपी जेरबंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 13, 2021 04:13 AM2021-01-13T04:13:39+5:302021-01-13T04:13:39+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क ठाणे : ठाणे ग्रामीणच्या स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने ‘गुन्हेगार वॉच पेट्रोलिंग’मध्ये एका हत्येतील आरोपी संदीप दत्ताराम ...
लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे : ठाणे ग्रामीणच्या स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने ‘गुन्हेगार वॉच पेट्रोलिंग’मध्ये एका हत्येतील आरोपी संदीप दत्ताराम कदम (४०) याला जेरबंद केले आहे. त्याच्याकडून एक गावठी कट्टाही हस्तगत केल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेने रविवारी दिली.
ठाणे ग्रामीणमधील गुन्ह्यांना आळा घालण्यासाठी पोलीस अधीक्षक विक्रम देशमाने यांनी अलीकडेच गुन्हेगार वॉच पेट्रोलिंगचे आदेश दिले होते. या पार्श्वभूमीवर वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुरेश मनोरे यांच्या मार्गदर्शनाखाली २९ डिसेंबर २०२० रोजी पोलीस उपनिरीक्षक गणपत सुळे यांचे पथक म्हारळ, वरप आणि कांबा परिसरात पेट्रोलिंग करीत होते. त्यावेळी या परिसरात एक व्यक्ती रिव्हॉल्व्हर बाळगून असल्याची माहिती या पथकाला मिळाली. त्याचआधारे संशयास्पदरीत्या फिरणाऱ्या संदीप दत्ताराम कदम याला या पथकाने ताब्यात घेतले.
त्याच्या अंगझडतीमध्ये एक देशी बनावटीचा गावठी कट्टा त्याच्याकडून जप्त करण्यात आला. चौकशीमध्ये त्याचा चुलत भाऊ संदीप सीताराम कदम (३६, रा. म्हारळगाव, कल्याण) याची हत्या राजेश भांडवलकर (३१, रा. साकीनाका, मुंबई) याच्या मदतीने केल्याची कबुली आरोपीने दिली. गाडी भाड्याने पाहिजे, असा बहाणा करीत संदीप सीताराम कदम याचे २० डिसेंबर २०२० रोजी त्याच्या मोटारकारसह या आरोपींनी अपहरण केले. त्यानंतर त्याला एका अज्ञात ठिकाणी नेऊन गावठी कट्ट्याने त्याची हत्या केली. नंतर पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने, तसेच त्याच्या मृतदेहाची विल्हेवाट लावण्याच्या उद्देशाने सातारा जिल्ह्यातील मांढरदेवी येथील गडावरील घाटाच्या कपारीत टाकला.
ही माहिती मिळाल्यानंतर आरोपीविरुद्ध हत्या तसेच पुरावा नष्ट करणे, तसेच आर्म अॅक्टचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मनोरे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक भास्कर जाधव, उपनिरीक्षक सुळे, पोलीस हवालदार महाले आदींच्या पथकाने हा गुन्हा उघडकीस आणला. या दोन्ही गुन्ह्यांचा तपास आता स्थानिक गुन्हे शाखेकडून करण्यात येत आहे. दरम्यान, आरोपी कदम याला १२ जानेवारीपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश ठाणे न्यायालयाने दिले आहे.