मुंबई : महाराष्ट्रातील कायदा आणि सुव्यवस्था संपूर्णपणे ढासळली आहे. राज्यात जनता सुरक्षित नाही. त्यामुळे महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू करण्याची मागणी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याकडे पत्राद्वारे केल्याचे भाजप नेते नारायण राणे यांनी रविवारी माध्यमांना सांगितले. विविध हत्यांना आत्महत्या ठरविण्याचे काम सुरू असल्याचा आरोपही त्यांनी केला. (Murder is being turned into suicide in the state: Narayan Rane)नारायण राणे यांनी पत्रकारपरिषद घेऊन सचिन वाझे प्रकरणावरून शिवसेनेवर आरोप केले. तीन दिवसांपूर्वीच गृहमंत्री अमित शहा यांना पत्र पाठवून महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू करण्याची मागणी केली आहे. दिशा सालियनवर बलात्कार करून तिची हत्या करण्यात आली. दिशाच्या घरी तिचे काही मित्र गेले होते. त्यावेळी त्यांची बाचाबाची झाली. त्यातच तिची हत्या झाली. त्यावेळी तिथे एक मंत्रीही उपस्थित होता, असा दावा राणे यांनी केला. त्यानंतर अभिनेता सुशांतसिंह, पूजा चव्हाण यांच्या हत्येलाही आत्महत्या ठरविण्यात आले. अंबानी यांच्या घरासमोरील स्काॅर्पिओ गाडीचे मालक मनसुख हिरेन यांची हत्या करून त्यालाही आत्महत्येचा रंग देण्यात आला. अंबानी स्फोटक प्रकरणात पोलिसांचा वैयक्तिक कारणांसाठी वापर केला जात आहे. कुणाला तरी वाचविण्यासाठी हा सगळा खटाटोप सुरू आहे. कुणाला कधी काय होईल याची काही शाश्वती राहिली नाही. विकास नाही, पण भ्रष्टाचार मात्र वाढला आहे. त्यामुळेच राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करण्याची मागणी शहा यांच्याकडे केल्याचे राणे म्हणाले. दिशा सालियन ते मनसुख हिरेन अशा सर्व प्रकरणांपर्यंत वाझे यांची चौकशी झाली पाहिजे. जेलमध्ये असलेल्या रवी पुजारीलाही या प्रकरणात काही सांगायचे आहे, असे मी ऐकले आहे. त्यामुळे अजून कुणाच्या हत्या झाल्या आहेत का? याची चौकशी व्हायला हवी. सचिन वाझेंना शिवसेनेचा आश्रय आहे. म्हणूनच बेकायदेशीर कामे सुरू आहेत. वाझेंच्या जिवावरच शिवसेनेकडून लोकांना धमक्या दिल्या जातात. नाही तर तुम्हाला संपवून टाकू असे सांगितले जाते, असा आरोपही राणे यांनी केला.
राज्यात हत्यांना आत्महत्येचे स्वरूप दिले जात आहे : नारायण राणे
By ऑनलाइन लोकमत | Published: March 15, 2021 5:57 AM