सिगारेटच्या धुरामुळे झालेल्या वादातून तरुणाची हत्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 25, 2018 03:51 AM2018-03-25T03:51:52+5:302018-03-25T03:51:52+5:30
सिगारेटच्या धुरामुळे झालेल्या वादातून अल्पवयीन मुलाने २७ वर्षीय तरुणाची हत्या केल्याची घटना भांडुपमध्ये शुक्रवारी रात्री घडली. या प्रकरणी भांडुप पोलिसांनी अल्पवयीन मुलाला ताब्यात घेतले आहे.
मुंबई : सिगारेटच्या धुरामुळे झालेल्या वादातून अल्पवयीन मुलाने २७ वर्षीय तरुणाची हत्या केल्याची घटना भांडुपमध्ये शुक्रवारी रात्री घडली. या प्रकरणी भांडुप पोलिसांनी अल्पवयीन मुलाला ताब्यात घेतले आहे.
भांडुप पश्चिमेकडील यादव चाळीत रामजी मोती राजभर (२७) हा कुटुंबीयांसोबत राहतो. शनिवारी रात्री तो टेंभीपाडा परिसरात दारू पित होता. त्याच दरम्यान त्याच्या शेजारी बसलेल्या १७ वर्षांच्या अल्पवयीन आरोपीने सिगारेटचा धूर त्याच्या तोंडावर सोडला. यावरून दोघांमध्ये खटके उडाले. आरोपीने त्याच्या जवळील चाकूने त्याच्यावर वार केले. यामध्ये राजभर जखमी झाला. नागरिक जमताहेत पाहून आरोपीने पळ काढला. घटनेची वर्दी लागताच भांडुप पोलीस तेथे दाखल झाले. त्यांनी राजभरला रुग्णालयात नेले. तेथे दाखल करण्यापूर्वीच त्याला मृत घोषित करण्यात आले. या प्रकरणी हत्येचा गुन्हा दाखल करून भांडुप पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतले आहे.
क्षुल्लक वादातून हल्ला : भांडुप खडीमशीन येथे पूर्ववैमनस्यातून विघ्नेश महाडिक (२०) या तरुणावर चौकडीकडून प्राणघातक हल्ला चढविल्याची घटना घडली. महाडिकला लोखंडी सळईने मारहाण करण्यात आली. स्थानिकांच्या मदतीने त्याला रुग्णालयात दाखल केले. महाडिकच्या तक्रारीवरून भांडुप पोलिसांनी चौघांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.