ताडदेवमधील घटना, मद्यधुंद अवस्थेत मित्रांनीच केले सुरीने वार
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : पैसे, अनैतिक संबंधाबरोबर पूर्ववैमनस्यातून मुंबईत एका पाठोपाठ एक हत्यासत्र सुरू असताना गुरुवारी त्यात आणखी एका घटनेची भर पडली. ताडदेवमधे मद्यधुंद अवस्थेत क्षुल्लक वादातून २१ वर्षीय तरुणाची हत्या करण्यात आली आहे.
ताडदेव येथील आंबेडकरनगर परिसरात गुरुवारी पहाटे पावणेचार ते साडेचारच्या दरम्यान धर्मेश बारिया (२१) या तरुणाची हत्या करण्यात आली. मद्यधुंद अवस्थेत झालेल्या वादात दोन मित्रांनीच त्याच्यावर सुरीने वार केले. घटनेची माहिती मिळताच ताडदेव पोलीस तेथे दाखल झाले. त्यांनी याप्रकरणी दोघांविरुद्ध हत्येचा गुन्हा नोंदवत एकाला अटक केली.
मुंबईत जानेवारी ते एप्रिलदरम्यान हत्येच्या ५० घटना घडल्या. यापैकी ४७ गुन्ह्याची उकल करण्यात आली. यात, एप्रिल महिन्यात ७ तर मार्च महिन्यात १५ हत्येच्या घटनांचा समावेश आहे.
* यापूर्वीच्या घटना
- १ जून : दहिसरमध्ये अनैतिक संबंधात अडसर ठरणाऱ्या रहीस शेखची हत्या करून त्याच्या मृतदेहाचे तुकडे घरातील किचनमध्ये पुरण्यात आले होते. याप्रकरणी दहिसर पोलिसांनी पत्नी आणि प्रियकराला अटक केली.
- ३१ मे : वांद्रे येथे प्रेयसीच्या सतत पैसे मागण्याच्या सवयीला कंटाळून प्रियकराने तिची हत्या केली. गुन्हे शाखेने प्रियकर बिपीन विनोद कंडुलना याला अटक केली. ईशिता कुंजूर असे हत्या करण्यात आलेल्या तरुणीचे नाव हाेते.
- ३० मे : जुन्या वादातून वडाळ्यात ३१ वर्षीय वसंत कुमार देवेंद्र यांची कोयत्याने वार करून हत्या करण्यात आली. घटनेचा सीसीटीव्ही फुटेज समोर आल्याने परिसरात खळबळ उडाली हाेती.
- २८ मे : माहीम लिंक रोड परिसरात पैशावरून झालेल्या वादात मस्जिद यामिन खान (१८) याला लाकडी फळी व वायरने मारहाण करण्यात आली. यात त्याचा मृत्यू झाला. याप्रकरणी माहीम पोलिसांनी २८ वर्षीय मित्राला अटक केली.
- २७ मे : तृतीयपंथीयाकडे सेक्सची मागणी केली म्हणून सुहेल अहमद नूर मोहम्मद शाह (३६) या तरुणाची हत्या करण्यात आली. याप्रकरणी शिवाजीनगर पोलिसांनी सात जणांना अटक केली.
- २५ मे : वडाळा परिसरात शैलेंद्र ऊर्फ शेखी राजाराम गायकवाड याची धारदार शस्त्राने वार करून हत्या करण्यात आली. याप्रकरणी अनोळखी व्यक्तीविरोधात वडाळा पोलिसांनी हत्येचा गुन्हा नोंदवला असून तपास सुरू आहे.
..............................................