उकळलेले तेल ओतून घटस्फोटित पत्नीची हत्या
By admin | Published: April 18, 2017 06:06 AM2017-04-18T06:06:04+5:302017-04-18T06:06:04+5:30
पत्नीने घटस्फोट दिल्याच्या रागातून तिच्या अंगावर उकळलेले तेल ओतून हत्या करण्याची धक्कादायक घटना मालवणीत घडली.
मुंबई : पत्नीने घटस्फोट दिल्याच्या रागातून तिच्या अंगावर उकळलेले तेल ओतून हत्या करण्याची धक्कादायक घटना मालवणीत घडली. शमीना उर्फ मरियम (वय २६) असे या दुर्दैवी तरुणीचे नाव असून, या प्रकरणी तिचा पूर्वाश्रमीचा पती शादाब अली (३२) याला पोलिसांनी अटक केली आहे.
मरियमने सहा महिन्यांपूर्वी शादाबला घटस्फोट दिला होता. त्याचा राग मनात ठेवून त्याने घरात येऊन तिच्या अंगावर उकळलेले तेल ओतले. त्यामध्ये ती ४५ टक्के भाजली होती. रुग्णालयात उपचार सुरू असताना शनिवारी तिचा मृत्यू झाला.
नऊ वर्षांपूर्वी दोघांचा विवाह झाला होता. त्यांना ५ व ३ वर्षांची मुले आहेत. शादाब हा बेरोजगार असून, मरियम अंधेरीतील एका मॉलमध्ये काम करून उदरनिर्वाह करीत होती. मात्र पतीच्या मारहाण व छळाला कंटाळून सहा महिन्यांपूर्वी तिने घटस्फोट घेतला. त्यानंतर मुलासह स्वतंत्र राहत होती. शादाबला खर्चासाठी पैसे मिळत नसल्याने तो अस्वस्थ होता. गुरुवारी रात्री मुलांना भेटण्याच्या बहाण्याने २२ मार्चला तो तिच्या घरी येऊन मुलांना आपल्या आईच्या घरी सोडून आला. मरियम कामावरून आली तेव्हा तो स्वयंपाकघरात तेल उकळत होता. मुलांबाबत विचारणा केली असता शादाबने शिवीगाळ करीत वाद घातला. त्यानंतर भांड्यातील गरम तेल तिच्या अंगावर ओतले. तिने आरडाओरड करताच तो पळून गेला.
शेजाऱ्यांनी शमीनाला शताब्दी रुग्णालयात नेले. तेथून अधिक उपचारासाठी तिला मालाडच्या आॅस्कर हॉस्पिटलमध्ये दाखल केले. गुरुवारी उचारादरम्यान तिचा मृत्यू झाला. या प्रकरणी शादाबला अटक करण्यात आल्याचे मालवणी पोलिसांनी सांगितले. (प्रतिनिधी)