मुंबई : पाळीव कुत्र्याच्या तोंडातून क्रिकेटचा बॉल काढताना कुत्रा चावल्याने त्याच्या मालकाची हत्या केल्याबद्दल सत्र न्यायालयाने नऊ जणांना जन्मठेपेची शिक्षा ठोठावली.भांडुप येथे ६ जून २०१५ रोजी ही घटना घडली होती. अनिल पांडे (३०) हे त्यांचा पाळीव कुत्रा किवी याला फिरवण्यासाठी घराबाहेर पडले. तिथे काही अंतरावर काही मुले क्रिकेट खेळत होती. त्यांचा बॉल कुत्र्याच्या दिशेने येताच त्याने तो तोंडात पकडला. त्याच्या तोंडातून बॉल काढण्यासाठी एक मुलगा गेला असता कुत्रा त्याला चावला. त्यावरून तो मुलगा आणि अनिल यांच्यामध्ये वाद झाला. मुलाच्या मित्रांनी येऊन तो मिटवला. त्यानंतर अनिल यांचा मित्र त्यांना घरी घेऊन गेला.अनिल यांच्या हत्येची एकमेव साक्षीदार असलेली त्यांची पत्नी प्रिया यांनी दिलेल्या साक्षीनुसार, अनिल घरी आल्यानंतरही रागात होते. मध्यरात्री २ वाजता त्यांच्या घराबाहेर जोरजोरात भांडणाचा आवाज आला. खिडकीतून बाहेर पाहताच ज्यांच्याशी अनिलचे भांडण झाले होते ती मुले दरवाजाबाहेर क्रिकेट बॅट, काठ्या लोखंडी रॉड आणि तलवार घेऊन उभी होती. अनिल व त्यांचे कुटुंब घराबाहेर पळून जाऊ नये, यासाठी त्यांनी घराला बाहेरून कडी लावली होती आणि छताचा पत्रा काढून मुले आत शिरली व त्यांनी अनिलची हत्या केली, असे प्रियाने साक्षीत म्हटले.मात्र, आरोपींनी सर्व आरोप फेटाळले. मंदिराची घंटा चोरीला गेल्याने पीडित आणि त्यांच्यात वाद झाले. तसेच अनिल यांची हत्या आरोपींनी केली नसल्याचे आरोपींच्या वकिलांनी न्यायालयाला सांगितले.सरकारी वकील आमिन सोलकर यांनी बचावपक्षाचे म्हणणे फेटाळले. याप्रकरणी सोलकर यांनी २६ साक्षीदारांची साक्ष नोंदवली.न्यायालयाने सरकारी वकिलांनी आरोपींवरील गुन्हे सिद्ध केल्याचे म्हणत नऊ आरोपींन जन्मठेपेची शिक्षा ठोठावली.
क्रिकेट खेळताना कुत्रा चावला म्हणून हत्या; नऊ जणांना जन्मठेप
By ऑनलाइन लोकमत | Published: August 22, 2020 3:18 AM