जेवण न बनविल्याच्या रागात मित्राची हत्या
By ऑनलाइन लोकमत | Published: September 17, 2019 12:51 AM2019-09-17T00:51:56+5:302019-09-17T00:52:02+5:30
जेवण बनविण्यावरून झालेल्या वादापायी मित्राची हत्या केल्याचा प्रकार कुर्ला परिसरात उघडकीस आला आहे.
मुंबई : जेवण बनविण्यावरून झालेल्या वादापायी मित्राची हत्या केल्याचा प्रकार कुर्ला परिसरात उघडकीस आला आहे. या प्रकरणी कुर्ला पोलिसांनी अब्दुल रहीम अब्दुल रौफ खान (३८) यास अटक केली आहे. त्याने अब्दुल कलाम उर्फ शहाआलम सोनानुर उलहसन याची हत्या केली. दोघेही उत्तर प्रदेशचे रहिवासी आहेत.
गुरुवारी सकाळी दहिसर येथे राहत असलेल्या ट्रक चालक मोहम्मद अक्रम शाह (३३) याच्या मिठी नदीलगत पार्क केलेल्या ट्रकमध्ये अनोळखी तरुणाचा हात, पाय बांधलेल्या अवस्थेतील मृतदेह आढळून आल्याने खळबळ उडाली होती. कुठलाही पुरावा हाती नसताना आरोपीपर्यंत पोहोचण्याचे आव्हान पोलिसांसमोर होते. या प्रकरणी हत्येचा गुन्हा दाखल करीत कुर्ला पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दत्तात्रय शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली पीएसआय सत्यवान पवार आणि त्यांच्या पथकाने आरोपीचा शोध घेण्यास सुरुवात केली. त्यात खबरी आणि तांत्रिक पुराव्यांच्या आधारे पोलीस पथक कुर्ला कमानी नगरपर्यंत पोहोचले. तेथे मृत व्यक्तीची ओळख पटली. तोच धागा पकडून त्यांनी रविवारी रात्री उशिराने खानला ताब्यात घेतले. खानने सुरुवातीला काहीही माहिती नसल्याचा आव आणला.
त्याच्या चौकशीत समोर आलेल्या माहितीनुसार, अडीच महिन्यांपूर्वी दोघेही मुंबईत आले. कमानी नगर येथील चिकन सेंटरमध्ये नोकरी करून ते तेथेच राहत होते. दहा दिवसांपूर्वी खानला जेवण बनविण्याचा कंटाळा आला. त्याने अब्दुलला जेवण बनविण्यास सांगितले. त्याने नकार दिला. जेवण बनविण्यावरून दिवसभर दोघांमध्ये वाद सुरू होते. या वादानंतर खानने अब्दुलची हत्या करण्याचे ठरवले. १२ तारखेच्या रात्री त्याने दारूपार्टीचा बेत आखला. चालत चालत दोघेही मिठी नदीलगत पार्क केलेल्या शाहच्या ट्रकमध्ये बसले. तेथे अब्दुलला बिर्याणी खायला दिली. त्यानंतर शुद्ध हरपेपर्यंत दारू पाजली. तो बेशुद्ध होताच त्याचे हात-पाय दोरखंडाने ट्रकला बांधले आणि जवळील चाकूने त्याच्या पोटावर, गळ्यावर वार करीत निर्घृण हत्या केली.
>हत्येनंतर काहीच न झाल्याचा आव
हत्येनंतर चिकन सेंटर गाठून तेथे तो झोपी गेला. त्यानंतर काहीच झाले नसल्याचा आव आणून तो राहत होता. अब्दुलचे कोणी जवळचे नातेवाईक नव्हते. त्यामुळे त्याच्याविरुद्ध कोणी हरविल्याची तक्रार दिली नाही. तो गावी निघून गेल्याचे मालकाला वाटले. मात्र, पोलिसांनी शिताफीने या गुन्ह्याचा छडा लावून खानला बेड्या ठोकल्या.