कर्नाटकमधील सराफाची चेंबूरमधील हॉटेलमध्ये हत्या
By admin | Published: January 15, 2017 05:00 AM2017-01-15T05:00:03+5:302017-01-15T05:00:03+5:30
हॉटेलच्या बंद खोलीमध्ये कर्नाटकमधील एका सराफाची हत्या झाल्याची घटना शनिवारी चेंबूरमध्ये घडली. एस. सतीश (३४) असे या सराफाचे नाव असून या प्रकरणी चेंबूर
मुंबई : हॉटेलच्या बंद खोलीमध्ये कर्नाटकमधील एका सराफाची हत्या झाल्याची घटना शनिवारी चेंबूरमध्ये घडली. एस. सतीश (३४) असे या सराफाचे नाव असून या प्रकरणी चेंबूर पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल करत तपास सुरू केला आहे.
चेंबूर रेल्वे स्थानक परिसरात असलेल्या कमला गेस्ट हाउसमध्ये गेल्या चार दिवसांपासून हा व्यापारी राहत होता. शुक्रवारपासून तो रूमबाहेर आला नाही. त्यामुळे हॉटेलमधील कर्मचाऱ्यांना संशय आला. त्यांनी ही बाब हॉटेल मालकाला सांगितली. हॉटेल मालकाने तत्काळ चेंबूर पोलिसांना माहिती दिली. त्यानुसार घटनास्थळी दाखल झालेल्या पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन तो शवविच्छेदनासाठी राजावाडी रुग्णालायत पाठवला आहे. सरफाच्या शरीरावर मोठ्या प्रमाणात जखमा असल्याने त्याची हत्या झाल्याचा संशय पोलिसांना आहे. तसेच या सराफासोबत एक इसमदेखील राहत होता. मात्र तो बेपत्ता असल्याने पोलिसांचा संशय वाढला आहे. (प्रतिनिधी)
सीसीटीव्ही फुटेज ताब्यात
- हॉटेलमधील सीसीटीव्ही फुटेज पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. सराफासोबत राहणारा इसम बेपत्ता असल्याने पोलिसांचा त्याच्यावरील संशय बळावला आहे. या प्रकरणी पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल करत संशयिताचा शोध घेण्यास सुरुवात केली आहे.