माटुंग्यातील हत्येचे गूढ कायम
By admin | Published: June 26, 2016 04:13 AM2016-06-26T04:13:53+5:302016-06-26T04:13:53+5:30
माटुंग्यातील मंजुळाबेन वोरा (८२) यांच्या हत्येबाबत पोलिसांना अद्याप कोणतेही धागेदोरे सापडले नसल्याचे दिसून येत आहे. मालमत्ता, चोरी, पूर्ववैमनस्य या सर्व दृष्टिकोनातून माटुंगा पोलीस
मुंबई : माटुंग्यातील मंजुळाबेन वोरा (८२) यांच्या हत्येबाबत पोलिसांना अद्याप कोणतेही धागेदोरे सापडले नसल्याचे दिसून येत आहे. मालमत्ता, चोरी, पूर्ववैमनस्य या सर्व दृष्टिकोनातून माटुंगा पोलीस, गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांनी तपास केला. मात्र, तपासाला योग्य दिशा दाखवेल, असा एकही दुवा पोलिसांच्या हाती लागलेला नाही.
प्रणव रेसिडेन्सीतील राहत्या घरात ६ जूनला वोरा यांची गळा चिरून हत्या करण्यात आली होती. अतिशय शिताफीने एकाच वारामध्ये वोरा त्यांची हत्या झाली. हत्या झाली, तेव्हा मंजुळाबेन यांचे मनोरुग्ण बंधू रविलाल दोषी (७०) घरातच होते. रविलाल यांचे पाय सुजल्याने ६ जूनला सकाळी मंजुळाबेन यांनी डॉ. दिलीप शहा यांना घरी येण्याची विनंती केली. त्यात घरी आलेले शहा यांना पाहून आरोपीने बाहेर पळ काढला होता. डोक्यावर पांढरी कॅप आणि कानात बाली असलेला हा तरुण सीसीटीव्ही चित्रणात पाठमोरा कैद झाला. सीसीटीव्ही चित्रणावरून दोन तास हा अनोळखी मारेकरी वोरा त्यांच्या घरात होता, अशी माहिती पोलिसांना मिळाली. दागिने, घरातील अन्य किमती वस्तू जशाच्या तशा होत्या. त्यामुळे या हत्येमागील चोरीचा उद्देश पहिल्या दिवशीच पोलिसांनी फेटाळून लावला. मालमत्ता हडपण्यासाठी वोरा हत्या करण्यात आली असावी, या दृष्टीनेही पोलिसांनी तपास केला. मात्र, काहीही निष्पन्न झालेले नाही. हत्येनंतर पोलिसांनी इमारतीचे खासगी सुरक्षारक्षक, शेजाऱ्यांकडील नोकर, वोरा यांच्या घरी काम करणारे दोन नोकर, त्यापैकी एकाचा मुलगा अशा अनेकांकडे या प्रकरणी चौकशी केली आहे. (प्रतिनिधी)
इमारतीत संशयित आरोपीप्रमाणे दिसणारा एक तरुण आला होता. त्याने आरोपीप्रमाणेच टोपी घातली होती. वोरा यांच्यासमोरील फ्लॅटमधून घरकामासाठी बोलावल्याचे त्याने सुरक्षारक्षकाला सांगितले, अशी अफवा पसरली होती.
माटुंगा पोलिसांनी ही बाब पडताळली असता, अशी कोणतीही व्यक्ती इमारतीत आली नसल्याचे स्पष्ट झाले. याचे गूढ उकलण्यास पोलिसांना यश आलेले नाही. तपास सुरू असून, लवकरच मारेकऱ्याला अटक करण्यात येईल, अशी माहिती माटुंगा पोलिसांनी दिली.