मुंबई : मुलुंडमध्ये राहत्या घरी २२ वर्षीय नवविवाहितेचा गळफास घेतलेल्या अवस्थेत मृतदेह आढळल्याने रविवारी खळबळ उडाली आहे. ही हत्या की आत्महत्या याचा शोध मुलुंड पोलीस घेत आहेत. आरती प्रशांत फाफडे (२२) असे नवविवाहितेचे नाव आहे.मुलुंडच्या पश्चिमेकडील विश्वसहकार इमारतीच्या चौथ्या मजल्यावर आरती पतीसोबत राहायची. याच इमारतीच्या १० व्या मजल्यावर सासू-सासरे राहतात. १ आॅगस्ट रोजी आरतीने प्रशांतसोबत प्रेमविवाह केला. मुलुंड पोलिसांकडून ही बाब आरतीच्या आईवडिलांना समजली. आरतीच्या हट्टामुळे आईवडिलांनी विरोध केला नाही.पहिल्याच दिवशी याच इमारतीच्या दहाव्या मजल्यावर राहत असलेल्या सासरच्यांनी आरतीला नाकारले. त्यांनी चौथ्या मजल्यावरील घराची चावी मुलाच्या हातात दिली. तेव्हापासून ते दोघेच तेथे राहण्यास होते. रविवारी सकाळीच प्रशांत सहलीसाठी बाहेर पडला, तर सासू-सासरेही कामानिमित्त बाहेर होते.बराच वेळ होऊनदेखील आरती कॉल उचलत नाही म्हणून त्याने नातेवाइकांना घरी धाडले. तेव्हा सायंकाळी साडेपाचच्या सुमारास आरती ओढणीच्या साहाय्याने गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळली. घटनेची वर्दी लागताच, मुलुंड पोलीस तेथे दाखल झाले. त्यांनी आरतीचा मृतदेह ताब्यात घेतला. शवविच्छेदनासाठी राजावाडी रुग्णालयात धाडला. या प्रकरणी अपमत्यूची नोंद करत मुलुंड पोलीस अधिक तपास करत आहेत.रविवारी सायंकाळी आरतीच्या कुटुंबीयांनी मृतदेह ताब्यात घेण्यास नकार दिला. लग्नाच्या काही दिवसांपासून आरतीचा छळ सुरू होता. प्रशांतचे बाहेर अनैतिक प्रेमसंबंध होते. त्याने आरतीला फक्त पैशांसाठी प्रेमाच्या जाळ्यात ओढले आणि तिच्याशी विवाह केला. लग्नाच्या काही दिवसांत तिला मारहाण सुरू केली. याच रागात गुरुवारी ती घर सोडून निघून गेली होती. त्याने तिची समजूत काढून घरी आणले. घटनेच्या आदल्या रात्रीही दोघांमध्ये कडाक्याचे भांडण झाले होते. त्यानेच आरतीची हत्या करून तो बाहेर निघून गेला आणि तिने आत्महत्या केल्याचा आव तो आणत असल्याचा आरोप आरतीची आई अर्चना जगदीश मोहिते यांनी केला आहे.
मुलुंडमध्ये नवविवाहितेची आत्महत्या की हत्या?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 21, 2018 4:45 AM