'अभिषेक घोसाळकरांची हत्या म्हणजे उबाठा गटातील गॅंगवॉरचा परिणाम'; नितेश राणेंचा दावा
By ऑनलाइन लोकमत | Published: February 9, 2024 01:09 PM2024-02-09T13:09:50+5:302024-02-09T13:11:58+5:30
Abhishek Ghosalkar: भाजपाचे आमदार नितेश राणे यांनी व्हिडीओद्वारे खळबळजनक दावा केला आहे.
Abhishek Ghosalkar: फेसबुक लाईव्हदरम्यान शिवसेनेच्या ठाकरे गटाचे माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकरांवर मॉरिस नोरोन्हा ऊर्फ मॉरिस भाईच्या कार्यालयातच पाच गोळ्या झाडून त्यांची हत्या केल्याने मुंबई हादरली. घोसाळकरांच्या हत्येपाठोपाठ मॉरिसनेही स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या केल्याचा संशय आहे. याप्रकरणी पोलिसांसह गुन्हे शाखा अधिक तपास करत आहे.
अभिषेक घोसाळकर हत्या प्रकरणी विरोधी नेत्यांकडून गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी करण्यात येत आहे. यावर भाजपाचे आमदार नितेश राणे यांनी व्हिडीओद्वारे खळबळजनक दावा केला आहे. अभिषेक घोसाळकर यांची हत्या म्हणजे उबाठा गटातील गॅंगवॉरचा परिणाम आहे, अशी चर्चा सुरु असल्याचा दावा नितेश राणे यांनी केला आहे.
FB Live वेळी मी दरवाजा उघडला, मला बाहेर काढलं अन्...; प्रत्यक्षदर्शीने सांगितली थरारक घटना
एककीडे आदित्य ठाकरे आणि दुसरीकडे संजय राऊत यांच्यात मातोश्रीवर गँगवॉरचा सुरु आहे. आरोपी मॉरिस काँग्रेसच्या राहुल गांधी यांच्या न्याय यात्रेची तयारी देखील करत होता. तसेच मॉरिसने माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे नेहमी बॅनर का लावले?, असा सवाल नितेश राणे यांनी उपस्थित केला. संजय राऊत ज्या पद्धतीने तेजस ठाकरे यांना प्रमोट करताय, याचा राग आदित्य ठाकरेंच्या गटात वाढत चालला आहे. त्यामुळे हा गँगवॉर मोठ्या प्रमाणात वाढला आहे. देवेंद्र फडणवीसांवर आरोप करायच्या आधी स्वत:चं बघा. हा गॅंगवार आधी थांबवा आणि मग महायुती सरकारवर आरोप करा, असंही नितेश राणे म्हणाले.
मुंबई: ठाकरे गटाचे माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकर यांची हत्या म्हणजे उबाठा गटातील गॅंगवॉरचा परिणाम आहे, अशी चर्चा सुरु असल्याचा दावा नितेश राणे यांनी केला आहे. @NiteshNRanepic.twitter.com/ekZ2jchi9c
— Lokmat (@lokmat) February 9, 2024
प्रत्यक्षदर्शींनं काय सांगितलं?
अभिषेक घोसाळकर गोळीबार प्रकरणी एक नवीन माहिती समोर आली आहे. अभिषेक घोसाळकर यांच्या हत्येपूर्वी लालचंद पाल हे स्वत: त्यांच्यासोबत होते. गोळीबार झाला तेव्हा घटनास्थळीच असलेल्या पाल यांनी तिथे नेमकं काय झालं? तो थरारक अनुभव सांगितला. 'एका मराठी वृत्तवाहिनी'शी बोलताना लालचंद पाल म्हणाले की, काल सकाळी अकरा वाजता अभिषेक घोसाळकर यांना मॉरिसचा फोन आला की, संध्याकाळी महिलांना साड्या वाटपाचा कार्यक्रम आहे. पण साडी वाटण्याआधी, मॉरिसने अभिषेक घोसाळकर यांना फेसबुक लाईव्ह करण्यासाठी त्याच्या ऑफिसमध्ये नेले. मी त्यांच्यासोबत होतो. मॉरिसच्या कार्यालयात दोघंही बोलत होते.
मी खूप वेळ झाल्यामुळे दरवाजा उघडूनमध्ये गेलो, तेव्हा दोघं मोबाईलद्वारे फेसबुक लाईव्ह करत होते. मी गेल्यावर थोड्यावेळाने आम्ही येतो, असं बोलून मॉरिसने मला बाहेर काढलं, असं लालचंद पाल यांनी सांगितले. त्यानंतर बंदुकीच्या गोळीचा आवाज आला आणि मी आत धावलो, तर अभिषेक हे खाली पडला होता आणि मॉरिस त्याच्यावर गोळीबार करत होता. बंदुकीतील गोळ्या संपल्यानंतर सुद्धा मॉरिस सतत अभिषेक यांच्यावर गोळीबार करत होता, असं लालचंद पाल यांनी म्हणाले. मॉरिस आणि अभिषेकमध्ये आधीच वाद झाला होता, तो संपवण्यासाठी ख्रिसमसच्या वेळी मॉरिसने अभिषेक यांचे बॅनर पोस्टर लावून जवळीक वाढवल्याची माहिती समोर आली आहे.