मुंबई : महिलेचा गळा दाबून तिचा खून करून मृतदेह प्लास्टिकमध्ये गुंडाळून ठेवल्याचे गोरेगाव पूर्व येथील अशोकनगरमधील एका घरात आढळून आले आहे. याप्रकरणी वनराई पोलिसांनी तिच्या पतीविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
दिव्या टोपो (२९) असे खून करण्यात आलेल्या महिलेचे नाव आहे. गळा दाबून तिचा खून करण्यात आला असून, तिच्या आधार कार्डवरून तिची ओळख पटली आहे. तिचा मृतदेह प्लास्टिकमध्ये गुंडाळून गोणीत भरून ठेवलेला होता. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेत तो शवविच्छेदनासाठी पाठवला आहे. दरम्यान, या घटनेनंतर दिव्या हिचा पती जयराम लकडा (३०) हा पळून गेल्याचा पोलिसांना संशय आहे.
जयराम फरार-
१) तिचा पती जयराम हा फरार असून त्याच्याविरुद्ध हत्या आणि गुन्ह्याचा पुरावा गायब करणे, या कलमाखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
२) या प्रकरणाची सध्या चौकशी सुरू असून संशयित आरोपीचा मोबाइल नंबर बंद आहे.
दुर्गंधीमुळे प्रकार उघडकीस-
१) पोलिसांच्या म्हणण्यानुसार, हे जोडपे मूळ ओडिशाचे असून ते मजूर होते. गोरेगाव पूर्व येथील अशोकनगर येथे तळ अधिक एक मजल्याच्या वास्तूत हे जोडपे गेल्या दोन वर्षांपासून राहत होते.
२) दाम्पत्याच्या घराखाली एक दुकान आहे, ते त्यांचे घरमालक चालवतात. दाम्पत्याच्या बंद घरातून दुर्गंधी येत असल्याचा घरमालकाला संशय आला.
३) दाम्पत्याच्या खोलीचे त्यांनी कुलूप तोडले असता त्यांना चादर आणि प्लास्टिकमध्ये मृतदेह कुजलेल्या अवस्थेत आढळून आला. मृतदेह उघडला असता, फिर्यादीने तो दिव्याचा असल्याची ओळख पटवली. तिच्या गळ्यात नायलॉनची दोरी दिसली आणि तिचे पायही दोरीने बांधलेले दिसले.