प्रेयसीला पैसे देण्यासाठी वृद्धेची हत्या; दाेघांना अटक
By ऑनलाइन लोकमत | Published: May 30, 2021 05:48 AM2021-05-30T05:48:59+5:302021-05-30T05:58:47+5:30
भांडुप पश्चिमेकडील क्वारी रोड येथील फुगावाला कम्पाउंड परिसरात रतनलाल मोहनलाल जैन (७०) या एकट्याच राहत हाेत्या. १५ एप्रिलला राहत्या घरी रक्ताच्या थारोळ्यात त्यांचा मृतदेह आढळला.
मुंबई : प्रेयसीला पैसे पुरविण्यासाठी प्रियकराने भांडुपमधील ७० वर्षीय वृद्धेची हत्या केल्याची माहिती भांडुप पोलिसांच्या तपासातून उघडकीस आली आहे. याप्रकरणी भांडुप पोलिसांनी प्रियकर इमरान मुंने मलिक (वय २६) यासह त्याची प्रेयसी दीपाली अशोक राऊत (३६) या दोघांनाही शुक्रवार, २८ मे राेजी अटक केली.
भांडुप पश्चिमेकडील क्वारी रोड येथील फुगावाला कम्पाउंड परिसरात रतनलाल मोहनलाल जैन (७०) या एकट्याच राहत हाेत्या. १५ एप्रिलला राहत्या घरी रक्ताच्या थारोळ्यात त्यांचा मृतदेह आढळला. त्यांच्या मुलीच्या तक्रारीवरून भांडुप पोलिसांनी अधिक तपास सुरू केला.
भांडुप पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शाम शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने २५० कुटुंबे, ५००हून अधिक नागरिक, वृद्ध महिलेकडून पैसे घेणारे, वाहनधारक, नातेवाईक, ९८ ज्वेलर्स दुकानदार, आंबे विक्रेत्यांकडेही चौकशी केली. ३०० पेक्षा जास्त सीसीटीव्हीतील फुटेज तपासले. दरम्यान, त्याच परिसरात राहणारा इमरान बेपत्ता असल्याची माहिती मिळताच, पथकाने तपासाअंती उत्तर प्रदेशमधून त्याला ताब्यात घेतले.
तपासातील माहितीनुसार, मूळचा उत्तर प्रदेशचा रहिवासी असलेला इमरान त्याच परिसरात भाड्याने राहत हाेता. ताे सलूनमध्ये नोकरी करायचा. जैन व्याजाने पैसे देत. इमरानच्या घरमालकिणीने त्यांच्याकडून पैसे घेतल्याने त्या इमरानला भाड्याचे पैसे जैन यांना थेट देण्यास सांगत. त्यामुळे इमरान त्यांना ओळखत होता.
गेल्या काही दिवसांपासून प्रेयसी आणि त्याच्यात पैशांवरून खटके उडत होते. १५ एप्रिल राेजीही दाेघांमध्ये पैशांवरून वाद झाला. प्रेयसीला पैसे देण्यासाठी त्याने जैन यांच्या घरातील पैसे पळविण्याचे ठरविले. ठरल्याप्रमाणे त्यांचे घर गाठले. काहीतरी कारण सांगून त्यांना स्वयंपाक घरात पाठवून लुटीचा प्रयत्न केला. जैन यांना याची चाहूल लागताच त्यांच्या गळ्यावर चाकूने वार केले आणि घरातील साडेतीन लाखांचे दागिने घेऊन ताे पसार झाला.
अटकेच्या भीतीने पळाला गावी
प्रेयसीला त्याने घडलेला प्रकार सांगितला. मात्र, आपल्यापर्यंत पोलीस पोहोचल्यास त्यांना खरे सांगणार असल्याचे प्रेयसीने सांगताच, अटकेच्या भीतीने त्याने गावी पळ काढला. दोन वर्षांपूर्वी प्रेयसीने त्याच्याविरुद्ध भांडुप पोलीस ठाण्यात फसवणुकीची तक्रार दिली होती.
डायरीद्वारे मिळाली तपासाला दिशा
जैन व्याजाने पैसे देत असल्यामुळे त्याच्या नोंदी डायरीत ठेवत होत्या. त्यांच्या डायरीत ३५० जणांची नावे होती. त्यापैकी काही व्यक्ती गायब होत्या. पोलिसांनी हाच धागा पकडून आरोपीचा शोध घेतला.