आरोपीला क्राइम ब्रँचकडून अटक
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : मालवणीत अशोक यादव (३५) या व्यक्तीची गळा चिरून हत्या करण्यात आली होती. या प्रकरणी क्राइम ब्रँचच्या कक्ष ११ ने बुधवारी मारेकऱ्याच्या मुसक्या आवळल्या असून, अनैतिक संबंधातून हा प्रकार घडल्याचे उघड झाले आहे.
पृथ्वीराज उर्फ राज तोलाराम चौहान (२५) असे अटक केलेल्या व्यक्तीचे नाव आहे. त्याला खरोडी गावातून अटक करण्यात आली. यादव आणि चौहान एकाच परिसरात राहतात. यादव हा चौहानला सतत शिवीगाळ करीत मारहाण करायचा. दरम्यान, चौहानचे यादवच्या पत्नीसोबत अनैतिक संबंध असल्याचे यादवला समजले होते. त्यामुळे त्याचा काटा काढण्याचे चौहानने ठरविले. त्यानंतर यादवची धारदार चाकूने गळा चिरून हत्या केली. ही घटना घडली त्या ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे नाहीत. मात्र तरीही कक्ष ११ चे प्रमुख सुनील माने यांचे पथक मारेकऱ्यापर्यंत पोहोचले. यात सहायक पोलीस निरीक्षक नितीन उतेकर आणि त्यांच्या पथकाने महत्त्वाची भूमिका बजावत प्रकरण अवघ्या चोवीस तासांत उघड केले. खरोडीत यादवचा मृतदेह सापडला होता. या प्रकरणी मालवणी पोलिसांत गुन्हा दाखल झाला होता.