मुंबई : मालाडमधील महेश पटेल (३५) नामक तरुणाच्या अंत्यसंस्काराच्या दोन महिन्यांनंतर त्याची हत्या झाल्याचे समोर आले आहे. विवाहबाह्य संबंधातील अडथळा दूर करण्यासाठी पत्नी आणि तिच्या प्रियकराने त्याची हत्या केल्याचे गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या कक्ष ८ ने उघड केले. प्रियकरासह दोघांच्या मुसक्या शुक्रवारी आवळल्या असून, पत्नी पसार झाली आहे. अटक मुख्य आरोपी हा एका खासगी रुग्णालयातील कर्मचारी आहे.
मालाडच्या मढ परिसरात राहणाºया पटेलच्या पत्नीचे अरूप दास (२५) याच्यासोबत विवाहबाह्य संबंध होते. दास हा एका खासगी रुग्णालयात किचन सुपरवायझर म्हणून काम करतो. मालाडच्या हिंदू स्मशानभूमीत २१ डिसेंबर, २०१९ रोजी पटेलचा नैसर्गिक मृत्यू झाल्याचे सांगत, त्याच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. मात्र, पटेलची पत्नी आणि तिच्या प्रियकराने खाण्यात झोपेच्या गोळ्या देऊन आणि नंतर गळा दाबून त्याची हत्या केल्याची माहिती कक्ष ८चे प्रमुख अजय जोशी यांना मिळाली. सहायक पोलीस निरीक्षक कारंडे, शेलकर आणि पथकाने स्मशानभूमीत जाऊन चौकशी केली, तेव्हा पटेलच्या नावाची नोंद त्यांना मिळाली. पटेल राहत असलेल्या पास्कलवाडीत केलेल्या चौकशीत दासमुळे पटेल आणि त्याच्या बायकोमध्ये भांडणे व्हायची, ही बाब पोलिसांना समजली़ त्यांनी दासला ताब्यात घेतले. त्याने पटेलची पत्नी आणि त्याचा मित्र सागर शर्मा (२८) जो रिक्षाचालक आहे, यांच्या मदतीने हत्या केल्याची कबुली दिली.मृत्यू प्रमाणपत्र कसे मिळविले ?पटेलची हत्या गुंगीचे औषध देत नंतर गळा आवळून झाली, असे पोलीस तपासात उघड झाले आहे. मात्र, आजारी नसलेल्या पटेलचा मृत्यू नेमका कोणत्या कारणाने झाला, याचे कारण शोधण्यासाठी त्याचे शवविच्छेदन होणे गरजेचे होते. मात्र, ते न करताच त्याला स्थानिक डॉक्टरने मृत्यूचे प्रमाणपत्र कसे दिले? याबाबत जोशी यांचे पथक चौकशी करत आहेत.