मुंबई: मित्राला स्वतःच्या पत्नीसोबत आक्षेपार्ह अवस्थेत पाहिले आणि त्या रागात त्याला ठार मारण्याची घटना शनिवारी अंधेरीत उघडकीस आली. संतोष फाल्गुन किरूपल्ली (२५) असे मयताचे नाव असून तो मेट्रोच्या विविध साईटवर सुरक्षा रक्षक म्हणून काम करत होता. याप्रकरणी अंबोली पोलिसांनी राकेश देवेंद्र याला अटक केली आहे.
अंधेरी पश्चिमच्या जीवननगर झोपडपट्टीमध्ये देवेंद्रची पत्नी जया तिच्या पहिल्या पतीचा मुलगा ऑस्तीन (१५) याच्यासोबत राहत होती. बिगारी काम करणारा देवेंद्र हा जयाचा दुसरा पती असून तो ऑस्तीनला सोबत ठेवायला तयार नव्हता. त्यावरून त्यांच्यात वाद झाले आणि आठ महिन्यांपूर्वी ती देवेंद्रचे सायन कोळीवाडा येथील घर सोडून अंधेरीत राहत होती. देवेंद्रचा मित्र संतोष याच्याशी तिची ओळख होती. दरम्यान कामावरून सुटून शुक्रवारी पहाटे ५ च्या सुमारास देवेंद्र हा अंधेरीत जयाच्या घरी पोहोचला.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, जया आणि संतोषला त्याने आक्षेपार्ह अवस्थेत पाहिले. त्यावरून त्याचा पारा चढला आणि दोघांमध्ये मारामारी सुरू झाली. त्याच दरम्यान देवेंद्रने घरातील चाकू आणला व संतोषवर हल्ला चढविला. ज्यात तो गंभीर जखमी झाला. जीवननगर झोपडपट्टीतील एका घरात भांडण सुरू आहे असा कॉल पोलिसांना नियंत्रण कक्षावर प्राप्त झाला. त्यानुसार अंबोली पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राधेश्याम शर्मा, सहायक पोलीस निरीक्षक व्हटकर आणि त्यांचे पथक घटनास्थळी दाखल झाले व सगळा प्रकार उघडकीस आला. पोलिसांनी जखमी संतोषला रुग्णालयात दाखल करण्यासाठी रुग्णवाहिका मागवली. मात्र उपचाराला नेताना डॉक्टरने त्याला तपासत मृत घोषित केले. ‘आम्ही आरोपी राकेश देवेंद्र याला अटक केली असून अधिक चौकशी सुरू आहे’ अशी माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक सोमेश्वर कामथे यांनी दिली.