लैंगिक अत्याचार करून हत्या
By Admin | Published: October 13, 2015 03:13 AM2015-10-13T03:13:52+5:302015-10-13T03:13:52+5:30
दोन दिवसांपासून गायब झालेल्या अडीच वर्षीच्या चिमुरडीवर लैंगिक अत्याचार करून तिची हत्या केल्याची धक्कादायक घटना सोमवारी घाटकोपरमध्ये उघड झाली
मुंबई : दोन दिवसांपासून गायब झालेल्या अडीच वर्षीच्या चिमुरडीवर लैंगिक अत्याचार करून तिची हत्या केल्याची धक्कादायक घटना सोमवारी घाटकोपरमध्ये उघड झाली. या चिमुरडीच्या बलात्काराच्या घटनेने पुन्हा एकदा मुंबई हादरली आहे.
घाटकोपर येथील रामजी नगर परिसरात अडीच वर्षीय सोनू (नाव बदललेले आहे) आई वडील आणि चार भावंडांसोबत राहण्यास होती. आई-वडील दोघेही बिगारी काम करतात. बुधवारी रात्री आठच्या सुमारास दुकानातून चॉकलेट आणते, असे सांगून ती घराबाहेर पडली ती परतलीच नाही. रात्री उशिरापर्यंत तिचा शोध घेतल्यानंतरही ती न सापडल्याने तिच्या कुटुंबीयांनी घाटकोपर पोलीस ठाण्यात तक्रार दिली. ८ आॅक्टोबर रोजी अपहरणाचा गुन्हा दाखल करून घाटकोपर पोलिसांनी तिचा शोध सुरू केला.
सोनूचा शोध सुरू असताना, ९ आॅक्टोबर रोजी येथील संघर्ष नगर परिसरातील दोनशे फूट खोल दरीत तिचा मृतदेह सापडला. तिच्या मृतदेहावर मोठ्या प्रमाणात जखमा आढळून आल्या. पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल करून तिचा मृतदेह शवविच्छेदनासाठी राजावाडी रुग्णालयात पाठविला. सोमवारी राजावाडी रुग्णालयाकडून आलेल्या शवविच्छेदनाच्या अहवालात तिच्यावर लैंगिक अत्याचार झाल्याचे उघड झाले. त्यामुळे तिच्या गुप्तांगासह संपूर्ण शरीरावर जखमा आहेत.
लैंगिक अत्याचार करून तिची
हत्या केल्याचा प्राथमिक अंदाज वर्तविण्यात येत आहे.
या प्रकरणी अधिक तपास सुरू असल्याची माहिती घाटकोपर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक व्यंकट पाटील यांनी दिली. या घटनेमुळे पुन्हा एकदा अल्पवयीन मुलींच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. (प्रतिनिधी)