बेवारस मृतदेहाच्या हत्येचा छडा
By Admin | Published: January 6, 2016 01:15 AM2016-01-06T01:15:48+5:302016-01-06T01:15:48+5:30
बेवारस अवस्थेत मिळालेल्या एका मृतदेहाची ओळख पटवून त्याच्या मारेकऱ्यापर्यंत पोहोचण्यास मुंबई पोलिसांना यश आले आहे.
मुंबई : बेवारस अवस्थेत मिळालेल्या एका मृतदेहाची ओळख पटवून त्याच्या मारेकऱ्यापर्यंत पोहोचण्यास मुंबई पोलिसांना यश आले आहे. या प्रकरणी धर्मेंद्र गुप्ता (४३), भिमाशंकर येवले (२९) यांना जबरी चोरी व दरोडाविरोधी पथकाने अटक केली आहे. आरोपींनी पूर्ववैमनस्यातून संदीप नायक या तरुणाची निर्घृण हत्या केली होती.
अंबरनाथ पूर्वेकडील शिळफाटा परिसरात २१ आॅगस्ट रोजी तरुणाचा मृतदेह आढळला होता. मृतदेहाच्या अंगावर घातक शस्त्रांनी वार केले होते. या प्रकरणी अंबरनाथ येथील शिवाजी नगर पोलीस ठाण्यात हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. गेल्या चार महिन्यांपासून या मृतदेहाची ओळख पटवून हत्येचा उलगडा करणे पोलिसांसमोर आव्हान होते. याप्रकरणी मुंबई गुन्हे शाखेचे जबरी चोरी व दरोडाविरोधी पथकही समांतर तपास करत होते.
मंगळवारी दोघे संशयित आरोपी मुलुंड चेकनाका परिसरातून जाणार असल्याची माहिती तपास पथकाला मिळाल्यानंतर त्यांनी त्यांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडील चौकशीत मृतदेह डोंबिवली येथील रहिवासी असलेले संदीप नायक याचा असल्याचे समोर आले. २०१४ मध्ये नायक याने अटक आरोपींच्या भावावर चॉपरने हल्ला केला होता. याच रागातून त्याची हत्या करण्यात आल्याचे तपासात उघड झाले. या गुन्ह्यातील तिसरा साथीदार असलेल्या देवराज ठाकूर याला दरोडा विरोधी पथकाने १ जानेवारी रोजी शस्त्र बाळगल्याच्या गुन्ह्यात अटक केली होती.
तो सध्या न्यायालयीन कोठडीत आहे. तिघांनाही शिवाजी नगर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहेत.(प्रतिनिधी)