विक्रोळीत विवाहितेची हत्या
By admin | Published: June 16, 2014 03:04 AM2014-06-16T03:04:11+5:302014-06-16T03:04:11+5:30
दोन महिन्यांपासून बंद असलेल्या खोलीत एका तीसवर्षीय विवाहितेचा कुजलेल्या अवस्थेतील मृतदेह सापडल्याने विक्रोळीत खळबळ उडाली आहे
मुंबई : दोन महिन्यांपासून बंद असलेल्या खोलीत एका तीसवर्षीय विवाहितेचा कुजलेल्या अवस्थेतील मृतदेह सापडल्याने विक्रोळीत खळबळ उडाली आहे. अर्चना ओमप्रकाश ठाकूर असे या विवाहितेचे नाव असून याप्रकरणी विक्रोळी पार्कसाइट पोलीस ठाण्यात अज्ञात आरोपीविरोधात हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, विक्रोळीच्या सूर्यानगर येथील नुरानी मशिदीजवळील एक खोली दोन महिन्यांपासून बंद होती. त्या खोलीचे भाडेही मिळत नसल्याने घरमालकाने शनिवारी पहाटे घराचा दरवाजा तोडून आत प्रवेश केला असता अर्चनाचा कुजलेल्या अवस्थेतील मृतदेह आढळला. मृतदेहावर असलेल्या जखमांवरून अज्ञात आरोपीने तिची चाकूने हत्या करून पळ काढला असल्याचे समजते. हत्येमागील नेमके कारण अद्यापही समोर आले नसून अर्चनाचा मृतदेह शवविच्छेदनासाठी राजावाडी रुग्णालयात पाठवण्यात आला आहे.अर्चनाला तीन मुले आहेत. विवाहानंतर ती पतीसह बिहारमध्ये राहण्यास गेली होती. आठ महिन्यांपूर्वी ती विक्रोळीच्या सूर्यानगर येथे राहणाऱ्या तिच्या आईच्या घरी परतली होती. दोन महिन्यांपूर्वी आईला काहीही न सांगता ती घराबाहेर पडली होती. त्याप्रकरणी पार्कसाइट पोलीस ठाण्यात ती हरवल्याची तक्रारही दाखल करण्यात आली होती, अशी माहिती पोलिसांनी दिली. या प्रकरणातील आरोपीचा शोध सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले. (प्रतिनिधी)