म.रेचे रडगाणे सुरुच, आता खड्डयामुळे खोळंबली रेल्वे
By admin | Published: June 26, 2015 09:19 AM2015-06-26T09:19:59+5:302015-06-26T10:53:20+5:30
तांत्रिक बिघाड, मुसळधार पाऊस अशा विविध कारणामुळे खोळंबणारी मध्य रेल्वे शुक्रवारी खड्ड्यामुळे रखडली.
ऑनलाइन लोकमत
ठाणे, दि. २६ - तांत्रिक बिघाड, मुसळधार पाऊस अशा विविध कारणामुळे खोळंबणारी मध्य रेल्वे शुक्रवारी खड्ड्यामुळे रखडली. उल्हासनगर येथे रेल्वे रुळालगत ८ ते १० फुट खोल खड्डा पडल्याने या मार्गावरील वाहतूक ऐन गर्दीच्या वेळी ठप्प पडल्याने प्रवाशांचे हाल होत आहेत.
शुक्रवारी सकाळी साडे सहाच्या सुमारास मध्य रेल्वेवरील उल्हासनगर - विठ्ठलवाडी स्टेशनदरम्यान ८ ते १० फुटांचा खड्डा पडल्याचे स्थानिकांच्या निदर्शनास आले. त्यांनी या घटनेची माहिती रेल्वे प्रशासनाला दिली. स्थानिकांच्या सतर्कतेमुळे या मार्गावरील मोठा अपघात टळला. याच मार्गावरुन अवघ्या काही मिनीटांनी खोपोली लोकल रवाना होणार होती. या घटनेची माहिती मिळताच रेल्वेचे पथक घटनास्थळी दाखल झाले आहेत. हा खड्डा कसा पडला याची माहिती अद्याप समजू शकलेली नाही. दोन तासांनी अंबरनाथहून सीएसटीकडे जाणारा मार्ग सुरु करण्यात यश आले असून या मार्गावरील वाहतूक धीम्यागतीने सुरु आहे. तर कल्याणहून अंबरनाथकडे जाणा-या मार्गावरील वाहतूक अद्याप सुरु करण्यात आलेली नाही. तर पुण्याच्या दिशेने जाणा-या लांबपल्ल्याच्या गाड्या दिवा - पनवेल - कर्जत मार्गावर वळवण्यात आल्या आहेत.